न्यूयॉर्क, 15 डिसेंबर : आपल्या आकाशगंगेतील तारा, म्हणजेच सूर्याचे आकर्षण हे वैज्ञानिकांना फार पूर्वीपासून आहे. मात्र, सूर्याचे तापमान आणि पृथ्वीपासून त्याचे असलेले अंतर यामुळे सूर्यापर्यंत पोहोचणे हे गेली कित्येक वर्षे एक स्वप्नच बनून होते. पण आता अवकाश संशोधनातील हा एक मोठा मैलाचा दगड नासाने पार केला आहे. नासाचे पार्कर सोलार प्रोब (Parker Solar Probe) या यानाने चक्क सूर्याच्या वातावरणात प्रवेश करत (NASA probe touched Sun) इतिहास घडवला आहे. मंगळवारी अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या बैठकीदरम्यान वैज्ञानिकांनी याबाबत माहिती दिली.
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी नासाने 2018 मध्ये पार्कर सोलार प्रोब (NASA Parker Solar Probe) हे यान लाँच केले होते. यापूर्वी 1976 साली सूर्याच्या सर्वात जवळ जाण्याची कामगिरी हेलियस 2 प्रोब (Helios 2 probe) या यानाने पार पाडली होती. हेलियस 2 प्रोब हे सूर्याच्या पृष्ठभागापासून 26.44 मिलियन मैल दूरपर्यंत पोहोचले होते. पार्करने मात्र हा रेकॉर्ड मोठ्या फरकाने मोडला आहे. आतापर्यंत पार्कर सूर्याच्या सगळ्यात जवळ, म्हणजेच सूर्याच्या पृष्ठभागापासून 8 मिलियन मैल (8 million miles within Sun’s surface) दूरपर्यंत पोहोचले आहे. फोर्ब्स वेबसाईटवर याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सूर्याच्या भोवताली असलेल्या वातावरणाला कोरोना (Sun’s Corona) म्हणतात. खरंतर पार्कर यानाने यावर्षी 28 एप्रिलला सूर्याच्या कोरोनामध्ये पहिल्यांदा प्रवेश केला होता. मात्र, याबाबतचा डेटा (Data from Parker Solar Probe) पृथ्वीवर पोहोचून त्याची पडताळणी करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागला. सूर्याच्या जवळ पोहोचल्यानंतर सात वेळा पार्करने कोरोनामध्ये (Sun’s Corona) प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. आठव्या प्रयत्नात त्याला सूर्याच्या सर्वात जवळ जाण्यास यश मिळाले. याबाबत बोलताना “हे अतिशय रोमांचकारी आहे” असे उद्गार प्रोजेक्ट सायंटिस्ट नौर रौआफी (Nour Raouafi) यांनी काढले. सूर्याचे वातावरण हे आम्हाला वाटले होते त्यापेक्षा अधिक धूसर असल्याचेही नौर म्हणाले.
अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाचे जस्टिन कास्पर म्हणाले, “आम्ही (पार्कर) तब्बल पाच तास सूर्याच्या वातावरणात होतो. पाच तास हे खरंतर कमी वाटत असतील, मात्र पार्कर सोलार प्रोब हे त्यावेळी सुमारे 100 किलोमीटर प्रतिसेकंद वेगाने (Parker Solar Probe speed) जात होते. त्यामुळे पाच तासांमध्ये त्याने सूर्याचा बराच भाग ओलांडला आहे.”
सूर्य हा खरंतर आगीचा गोळा आहे. सूर्याला पृष्ठभाग नसल्यामुळे तेथील जी काही प्रक्रिया होते ती या वातावरणात, म्हणजेच सूर्याच्या कोरोनामध्ये होते. त्यामुळे या कोरोनाबाबत जेवढी जास्त माहिती मिळेल, तेवढा आपल्याला सूर्याचा अधिक अभ्यास करता येणार आहे. पार्कर सोलार प्रोब हे सूर्याचे पार्टिकल्स आणि मॅगनेटिक फिल्ड (Sun’s Magnetic field) याची माहिती पृथ्वीवर पाठवत राहणार आहे. यामुळे आपल्याला सौरवादळे (Solar storms), त्याचा इतर ग्रहांवर आणि पृथ्वीवर होणारा परिणाम याबाबत अधिक माहिती मिळवता येणार आहे.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट आणि नोव्हेंबरमध्ये पार्करने सूर्याच्या कोरोनामध्ये पुन्हा प्रवेश केला होता. मात्र, यामधून मिळालेल्या डेटाची पडताळणी बाकी असल्यामुळे याबाबत अधिक माहिती देणे संशोधकांनी टाळले. 2025 ला पार्करची सूर्याभोवती शेवटची प्रदक्षिणा असणार आहे. तोपर्यंत, पार्कर सूर्याच्या वातावरणात आणखी आत प्रवेश करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nasa, Spacecraft, अंतराळ