Home /News /videsh /

दिलीप कुमारांच्या निधनानं गदगदलं पेशावर, तमाम पाकिस्तानी चाहत्यांचे डोळे पाणावले

दिलीप कुमारांच्या निधनानं गदगदलं पेशावर, तमाम पाकिस्तानी चाहत्यांचे डोळे पाणावले

दिलीप कुमार यांचं मूळ गाव असणाऱ्या पेशावरमध्ये घरोघरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    पेशावर, 7 जुलै : अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या निधनानं भारतातील त्यांच्या चाहत्यांप्रमाणंच पाकिस्तानच्या चाहत्यांनाही उदास वाटू लागलं आहे. दिलीप कुमार यांचं मूळ गाव असणाऱ्या पेशावरमध्ये (Peshawar) तर घरोघरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पेशावरमधील नागरिक दिलीप कुमारांची एकमेव आठवण असणाऱ्या त्यांच्या घरापाशी जमत आहेत आणि गल्लोगल्ली हाच एक विषय चर्चिला जात आहे. अखेरपर्यंत पेशावरशी नातं दिलीप कुमार यांचा जन्म पेशावरचा. 11 डिसेंबर 1922 या दिवशी दिलीप कुमार यांचा जन्म झाला. सध्या पाकिस्तानमध्ये असणारं पेशावर तेव्हा भारताचाच भाग होतं. पाकिस्तानचा जन्म तेव्हा झाला नव्हता. जन्मानंतर काही वर्षात दिलीप कुमार यांचं कुटुंब मुंबईला आलं आणि त्यानंतर ते कायमचे मुंबईकर झाले. मात्र पेशावरशी जुळलेली दिलीप कुमारांची नाळ अखेरपर्यंत तुटली नाही. या ना त्या कारणानं ते पेशावरच्या संपर्कात राहायचे. पेशावरमध्ये काय घडतंय,याची सतत त्यांना उत्कंठा असायची. पेशावरमधील अनेक पत्रकार आणि नागरिक यांच्याशी दिलीप कुमार यांची खास मैत्री होती आणि आपल्या जन्मगावची खुशाली ते अधूनमधून जाणून घेत राहायचे. ट्विटरवर दिसलं होतं प्रेम काही वर्षांपूर्वी अंथरुणाला खिळले असताना दिलीप कुमार यांना पेशावरच्या आठवणींनी अगदी व्याकूळ करून सोडलं होतं. त्यावेळी पेशावरमधून कुणी आपल्याला आपल्या घराचा फोटो पाठवू शकेल काय, अशी साद दिलीप कुमारांनी ट्विटरवरून घातली. बस्स, हे ट्विट अपलोड व्हायचा अवकाश... पेशावरकरांनी धडाधड दिलीप कुमारांच्या घराचे, गल्लीचे आणि आजूबाजूच्या परिसराचे फोटो अपलोड करायला सुरुवात केली. पेशावरकरांचा हा प्रतिसाद पाहून दिलीप कुमार किती गहिवरले होते, हे त्यानंतर त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी सांगितलं होतं. हे वाचा -दिलीप कुमार यांची शेवटची इच्छा राहिली अपूर्ण; पत्नीने ती गोष्ट करण्यास दिला नकार पाकिस्तानमध्ये झाल होता सन्मान चित्रपटसृष्टीतील कार्याबद्दल पाकिस्तान सरकारनं 1997 मध्ये निशान-ए-पाकिस्तान सन्मान प्रदान करून दिलीप कुमार यांचा गौरव केला होता. 1998 साली हा पुरस्कार स्विकारण्यासाठी जेव्हा ते पाकिस्तानात गेले, तेव्हा त्यांनी पेशावरला भेट दिली आणि आपलं घरही पाहिलं. 2017 मध्ये पाकिस्तान सरकारनं त्यांच्या घराला स्मारकाचा दर्जा दिला. त्या ठिकाणी एक शॉपिंग मॉल उभारण्याचा प्रयत्न झाला, पण तो पाकिस्तान सरकारनं हाणून पाडला. कला ही भौतिक सीमांची बंधनं ओलांडून सर्वांना व्यापून टाकते, असं म्हणतात. दिलीप कुमार यांच्यावर सीमेच्या दोन्ही बाजूंनी होणारा प्रेमाचा वर्षाव पाहिला, की त्याची अनुभूती येते.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Dilip kumar, Pakisatan

    पुढील बातम्या