मराठी बातम्या /बातम्या /विदेश /भयंकर! विमान हवेत असताना एका मांजराने कॉकपिटमध्ये शिरून केला पायलटवर हल्ला

भयंकर! विमान हवेत असताना एका मांजराने कॉकपिटमध्ये शिरून केला पायलटवर हल्ला

या अशा हल्ल्यामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आलं. पण हे नेमकं घडलं कसं?

या अशा हल्ल्यामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आलं. पण हे नेमकं घडलं कसं?

या अशा हल्ल्यामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आलं. पण हे नेमकं घडलं कसं?

खार्टूम (सुदान), 2 मार्च: पु. ल. देशपांडे यांनी आपल्या 'पाळीव प्राणी' या लेखात केलेलं मांजराबद्दलचं वर्णन ऐकून आपण अनेकदा हसलो असू. 'मांजर म्हणजे गाढवाहून निर्बुद्ध प्राणी. कुत्रा निदान काही तरी शिकतो; पण मांजरं मात्र काही शिकत नाहीत,' हे त्यांचं म्हणणं आपल्याला पटलंही असेल; पण सुदानमधल्या (Sudan) एका मांजराने मात्र ते म्हणणं खोडून काढण्याचा जणू पणच केला होता. त्या मांजराने चक्क एका विमानाचं इमर्जन्सी लँडिंग (Emergency landing after cat attacks pilot) करायला भाग पाडलं.

गेल्या बुधवारी सुदानमधल्या खार्टूम (Khartoum) विमानतळावरून कतारची राजधानी दोहा (Doha) इथे जाण्यासाठी तार्को एअरलाइनच्या (Tarco Airline) एका विमानाने उड्डाण केलं.  विमानाच्या पायलटला नेहमीच वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं; पण ते विमान लष्कराचं नसूनही त्या विमानाच्या पायलटवर जणू काही समरप्रसंगच ओढवला. उड्डाणानंतर थोड्याच वेळात पायलटवर हल्ला झाला... एका मांजराचा. चुकून कधी तरी विमानात शिरलेलं ते मांजर (Stowaway Cat), विमानाच्या उड्डाणानंतर त्याच्या पोटात गलबललं असणार. एकंदरीत उड्डाणाची कल्पना फारशी पसंत न पडल्याने त्या मांजराने शेवटी हल्ल्याचा मार्ग स्वीकारला असणार.

अचानक आणि अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्याने पायलट भांबावला नसता तरच नवल; पण त्याने प्रसंगावधान राखून केबिन क्रूकडे मदत मागितली. केबिन क्रू मेंबर्सही लगेच तिकडे धावले; पण मनुष्यप्राणी विरुद्ध मार्जारकुळ यांमध्ये उंच आकाशात सुरू असलेल्या या लढाईत अखेर मनुष्यप्राण्याला नमतं घेणं भाग पडलं. कारण चिडलेल्या मांजराला रोखणं अवघड असतं असं म्हणतात, त्याचा अनुभव त्या साऱ्यांनी घेतला. परिस्थिती आणखी नियंत्रणाबाहेर जाऊ नये, म्हणून अखेर वैमानिकाने यू-टर्न घेतला आणि विमान दोह्याला उतरायच्या ऐवजी पुन्हा खार्टूम विमानतळावर उतरलं. त्यानंतर ही लढाई संपली.

अवश्य वाचा -  कॅटवॉक करतचं गाडीसमोर उभी राहिली गाय; VIDEO पाहून तुम्हीही अवाक् व्हाल!

मांजराने विमानात नेमका कधी प्रवेश केला हे कळलं नाही. मात्र आदल्या रात्री हँगरमध्ये विमान पार्क केलेलं असताना कधी तरी ते आत शिरलं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात आला. या मांजराचा हा 'पराक्रम' अनोखा असला, तरी एकमेवाद्वितीय मात्र नाही. यापूर्वीही असे प्रसंग एक-दोनदा घडलेले आहेत. 2004मध्ये ब्रसेल्सवरून निघालेल्या एका विमानाला परत ब्रसेल्सलाच आणण्याची कामगिरी गिन नावाच्या एका मांजराने केली होती. अर्थात, ते मांजर चुकून शिरलेलं नव्हतं, तर त्याच्या मालकाच्या ट्रॅव्हल बॅगमधून निसटलं होतं. त्याच वर्षी सिल्हेटवरून बांगलादेशात ढाका इथे जाणाऱ्या विमानातही एक मांजर चुकून चढलं होतं आणि त्याच्यामुळे विमानाचं लँडिंग करावं लागलं होतं. लँडिंग झाल्यानंतरही त्याला विमानातून बाहेर काढण्यासाठी तब्बल दोन तास प्रयत्नांची शर्थ करावी लागली होती. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आताच्या मांजराने करून दाखवली.

मांजरं हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा विषय म्हणजेच एक कायमचा ट्रेंडिंग टॉपिक असतो. या मांजरानेही व्हायरल व्हायचं ठरवलं; पण काही तरी 'पराक्रम' करून! 'मांजर हा एक संशोधनाचा विषय आहे,' हे 'पुलं'चं वाक्य मात्र आपल्याला या घटनेमुळे 100 टक्के पटेल.

First published:

Tags: Cat, Sudan