कराची 17 जानेवारी : भारताच्या शेजारील राष्ट्र पाकिस्तान गेल्या कित्येक महिन्यांपासून विविध संकटांचा सामना करत आहे. अगोदरच महागाईचा सामना करत असलेल्या देशाला भयंकर पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला. त्यानंतर तेथील आर्थिक परिस्थिती फारच खालावली आहे. देशात पीठ, तांदूळ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असून नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. काही भागांत गहू आणि पीठाची टंचाई इतकी टोकाला गेली आहे की, पीठ खरेदीसाठी लोकांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ बघून पाकिस्तानमधील संकटाचा अंदाज लावता येत आहे.
'आज तक'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 2022 मध्ये आलेल्या महापुरामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती इतकी बिघडली आहे की, आता शाहबाज शरिफ सरकारला ती परिस्थिती पुन्हा रुळावर आणणं अशक्य वाटत आहे. तिथे सर्व वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. स्वयंपाकाच्या किरकोळ वस्तूही इतक्या महाग झाल्या आहेत की, सर्वसामान्य नागरिक त्यांच्या जेवणात समावेश करू शकत नाही. पीठ आणि तांदळाची अवस्थादेखील अशीच आहे. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी पीठ आणि तांदूळ कसातरी विकत घेणं गरजेचं आहे.
विमानतळावर हरवलेली सूटकेस चार वर्षांनंतर सापडली, उघडताच महिलेला बसला धक्का
सोशल मीडियावर पाकिस्तानमधील एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडिओमध्ये अनेक बाईक पिठानं भरलेल्या ट्रकच्या मागे जाताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करत एका ट्विटर युजरनं लिहिले की, "ही बाइक रॅली नाही. पाकिस्तानमधील हे लोक गाड्या घेऊन पीठानं भरलेल्या ट्रकचा पाठलाग करत आहेत. त्यांना फक्त अशी आशा आहे की कसं तरी त्यांना एक गोणी पीठ मिळेल." या व्हिडीओवर सोशल मीडिया युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
गेल्या आठवड्यापासून सिंध, बलुचिस्तानमधील अनेक भागांत गव्हाच्या पिठाचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक भागांत गव्हाच्या पीठाची एक गोणी तीन हजार पाकिस्तानी रुपयांना विकली जात आहे. वाढलेल्या महागाईमुळे तेथील जनतेचं जगणं कठीण झालं आहे. विशेष म्हणजे अशी परिस्थिती असूनही अद्याप तेथील सरकार, देशात आर्थिक संकट निर्माण झाल्याची बाब स्वीकारण्यास तयार नाही.
चीनने पूर्ण जगाची चिंता वाढवली; कोरोनाने 5 आठवड्यात 9 लाख लोकांचा मृत्यू, खरे आकडे हादरवणारे
पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) अन्नधान्य संकट शिगेला पोहोचलं आहे. पीओकेमधील नागरिक या संकटासाठी शरिफ सरकार आणि पीओके सरकारला दोष देत आहेत.
खैबर पख्तुनख्वा भागातील नागरिक इतके संतापले आहेत की, त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. लोकांनी पिठानं भरलेल्या ट्रकला घेराव घातला होता. ट्रकमध्ये सरकारी पीठ भरलेलं होतं. लोकांनी चालकावर दगडफेक करून ट्रक लुटण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि लोकांनी लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. एकाच नाही तर पोलिसांना अनेक ठिकाणी अशा प्रकारची कारवाई करावी लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Economic crisis, Pakistan