मुंबई, 11 ऑगस्ट : दिल्लीमध्ये 26 जानेवारी रोजी शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार (Delhi Violence) झाला होता. या आंदोलनाला चिथावणी देणारी ट्वीटर अकाऊंट (Twitter Account) बंद करण्याची सूचना भारत सरकारनं ट्वीटर प्रशासनाला दिली आहे. सरकारच्या या सूचनेकडं दुर्लक्ष करत ट्विीटरनं सर्व अकाऊंटवर कारवाई केली नाही. त्याचबरोबर आता तर या विषयावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत कोर्टात जाण्याची तयारी सुरु केल्याचं वृत्त आहे.
भारत सरकारशी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत संघर्ष करणाऱ्या ट्वीटरचा अमेरिकेतील एक मोठा निर्णय समोर आला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donalad Trump) यांच्यावरील बंदी हटवणार नसल्याचं ट्वीटरनं स्पष्ट केलं आहे. ट्रम्प यांच्यावरील ट्वीटर बॅन यापुढे देखील कायम राहील अशी माहिती कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) नेड सेगल (Ned Segal) यांनी दिली आहे.
( वाचा : …तर बड्या अधिकाऱ्यांना अटक होणार, केंद्र सरकार Twitter विरोधात आक्रमक )
काय आहे कारण?
सेगल यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान कंपनीची भूमिका स्पष्ट केली. सेगल यावेळी म्हणाले की, “आमचा पारदर्शकतेवर विश्वास आहे. ही एक चांगली बाब असल्याचं आम्ही मानतो. जेव्हा तुमची प्लॅटफॉर्मवरुन हकालपट्टी होते तेव्हा ती कायमस्वरुपी हकालपट्टी असते. तुम्ही सामान्य युझर, CFO, आजी किंवा माजी अधिकारी असला तरी त्याचा त्यावर परिणाम होत नाही. आमची धोरणं लोकांना हिंसेला प्रवृत्त करणारी नाहीत. याचं जर कुणी उल्लंघन केलं तर त्यांच्यावर आम्हाला बंदी घालावी लागेल.’’
अमेरिकेत 6 जानेवारी रोजी कॅपिटॉल हिलमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर (capitol hill violence) ट्रम्प यांची ट्वीटरवरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. यावेळी चुकीची माहिती प्रसारित केल्याच्या आरोपाखाली कंपनीनं सुमारे 70,000 पेक्षा जास्त अकाऊंट्सवर बंदी घातली आहे. यामध्ये अनेक हाय प्रोफाईल व्यक्तींच्या अकाऊंटचाही समावेश आहे.
(वाचा - रेस्क्यू ऑपरेशनचा थरार! निर्जन बेटावर नारळ, उंदीर खाऊन महिनाभर जिवंत राहिले)
दुसऱ्यांदा महाभियोग
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्यांदा महाभियोगाची सुनावणी सुरु झाली आहे. अमेरिकन लोकशाहीच्या 231 वर्षांच्या इतिहासात एखाद्या आजी किंवा माजी अध्यक्षांवर दुसऱ्यांदा महाभियोगाचा खटला चालवला जात आहे. कॅपिटोल हिलमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी समर्थकांना चिथावणी देण्याचा ट्रम्प यांच्यावर आरोप आहे.