मुंबई, 11 फेब्रुवारी : निर्जन बेटावर (Uninhabited Island) जवळपास महिनाभर अडकलेल्या नागरिकांची अमेरिकन कोस्ट गार्डने सुटका केली आहे. दोन पुरूष आणि एक महिला मागील एका महिन्यापासून या निर्जन बेटावर अडकून पडले होते. महिनाभर केवळ नारळ (Coconut) खाऊन त्यांनी स्वतःला जिवंत ठेवलं. बहामियन बेटावर (Bahaman island) अँगुइला गुहेमध्ये या 3 व्यक्ती अडकून पडल्या होत्या. अमेरिकन कोस्ट गार्डच्या (American Coast Guard) सैनिकांना या बेटावर झेंडा फडकताना दिसून आल्यानंतर त्यांनी बचाव कार्य करत या तीन जणांची सुटका केली. 9 फेब्रुवारीला हे बचावकार्य पार पडले असून सर्वसाधारण गस्त घालत असताना कोस्ट गार्डच्या जवानांची नजर या झेंड्याकडे (Flag) गेली. यानंतर त्यांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून खाद्यपदार्थ आणि पाणी देण्यात आलं. 8 फेब्रुवारीला बेटावर या व्यक्ती आढळून आल्यानंतर खराब हवामानामुळे दुसऱ्या दिवशी 9 फेब्रुवारीला बचावकार्य राबवत त्यांची सुटका करण्यात आली. यादरम्यान त्यांना संवाद साधण्यासाठी रेडिओ फोन देखील देण्यात आला होता. कोस्ट गार्ड लेफ्टनंट जस्टिन डोगर्टी यांनी एनबीसी 12 शी बोलताना सांगितलं, ‘आम्हाला तीन व्यक्ती झेंडे फडकवताना दिसल्या. या ठिकाणाहून रेस्क्यू केल्यानंतर त्यांना फ्लोरिडाच्या लोअर की मेडिकल सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सुदैवाने कुणालाही इजा झालेली नाही.’
#UPDATE @USCG rescued the 3 Cuban nationals stranded on Anguilla Cay. A helicopter crew transferred the 2 men & 1 woman to Lower Keys Medical Center with no reported injuries. More details to follow.#D7 #USCG #Ready #Relevant #Responsive pic.twitter.com/4kX5WJJhs8
— USCGSoutheast (@USCGSoutheast) February 9, 2021
बचाव केल्यानंतर या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची बोट खराब झाल्यानंतर पोहत ते या बेटावर पोहोचले. याठिकाणी 33 दिवस अडकल्यानंतर त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीत स्वतःला जिवंत ठेवलं. या 33 दिवसांमध्ये नारळ, उंदीर आणि विविध प्रकारचं मांस खात त्यांनी उदरनिर्वाह केला. लेफ्टनंट जस्टिन डोगर्टी यांनी याविषयी बोलताना या व्यक्ती महिन्याभरानंतर देखील सुस्थितीत असल्याचं सांगितलं. इतके दिवस राहिल्यानंतर देखील त्यांचं आरोग्य उत्तम असल्याचं पाहून आम्हाला आश्चर्य वाटल्याचं ते म्हणाले.