Home /News /videsh /

जगात कोरोनाने घेतला 1 लाख लोकांचा बळी, फक्त 8 दिवसांत मृतांचा आकडा दुप्पट

जगात कोरोनाने घेतला 1 लाख लोकांचा बळी, फक्त 8 दिवसांत मृतांचा आकडा दुप्पट

जगात कोरोनामुळे 9 जानेवारीला झालेल्या पहिल्या मृत्यूनंतर 31 मार्चपर्यंत 47 हजार लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर फक्त 9 दिवसांत 50 हजार जणांचा मृत्यू झाला.

    वॉशिंग्टन, 10 एप्रिल : चीनच्या वुहान प्रांतातून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसनं आतापर्यंत जगात एक लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत कोरोनामुळे जगातील मृतांचा आकडा एक लाखांच्या पुढे गेला. आतापर्यंत एकूण 1 लाख 56 हजार मृत्यू  झाले आहेत. पहिला मृत्यू 9 जानेवारीला चीनमध्ये झाला होता. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीनं शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत एकूण 4 लाख 66 हजार 396 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात एकट्या न्यूयॉर्कमध्ये 1,62,807 जणांना कोरोना झाला आहे. जगातील कोरोनाचा सर्वाधिक तडाखा ज्या देशांना बसला त्या स्पेन, इटली, फ्रान्स आणि जर्मनी यांच्यापेक्षा न्यूयॉर्कमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. न्यूयॉर्कमध्ये ब्रोक्स आयलंडवर मोठ्या प्रमाणावर मृतदेह दफन करण्यात आले आहेत. यामध्ये अशा मृतदेहांचाही समावेश आहे ज्यांची ओळख पटलेली नाही. यासाठी कामगारांना नेमण्यात आलं आहे. स्पेनमध्ये गेल्या 24 तासात 605 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत स्पेनसाठी ही दिलासादायक बाब आहे. जगात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूची संख्या इटलीत आहे. तिथं आतापर्यंत 18 हजार 297 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल अमेरिकेचा नंबर लागतो. अमेरिकेत 16697 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर स्पेनमध्ये 15447 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. फ्रान्समध्येही 12210 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. याशिवा इंग्लंडमध्ये मृतांची संख्या जवळपास 8 हजार इतकी झाली आहे. एक एप्रिलपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मृतांच्या संख्येचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये इटली, स्पेन आणि अमेरिकेत मृतांची संख्या झपाट्यानं वाढली. यामुळेच एक एप्रिलला कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडा 47 हजारांवर होता तो 10 एप्रिलपर्यंत एक लाखांवर पोहोचला आहे. फक्त 8 दिवसांत ही संख्या दुप्पट झाली आहे. हे वाचा : कोरोनाचा धोका वाढला, मुंबईत दिवसभरात 10 दगावले, रुग्णांनी हजाराचा टप्पा ओलांडला भारतातसुद्धा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या 24 तासांत देशात 37 जणांचा मृत्यू झाला असून 896 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 6761 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 206 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचं प्रमाण कमी आहे. कोरोनाला रोखण्यासाठी भारतानं वेळीच पावलं उचलंत 21 दिवसांचा लॉकडाऊन केला. हे वाचा : पुणेकरांनो काळजी घ्या! इटलीपेक्षाही अधिक आहे मृत्यूदर संपादन - सुरज यादव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या