तेहरान, 10 मार्च : आपल्याला कोरोनाव्हायरस (Coronavirus) होऊ नये, यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर या विषाणूपासून वाचण्यासाठी उपाय शोधले जात आहेत. व्हायरसबाबत अनेक अफवा पसरत आहेत आणि अशाच अफवेनं काही लोकांचा जीव घेतला आहे. 'कोरोना'च्या भीतीने लोकं मिथेनॉलही (Methanol) प्यायला लागलेत, ज्यामुळे 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
इराणची न्यूज एजन्सी IRNA च्या रिपोर्टनुसार व्हायरसपासून वाचण्यासाठी अनेक उपाय सांगितले जात आहेत. अशा काही अफवा पसरल्यानंतर काही लोकं मिथेनॉल प्यायले. यामुळे 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
इराणमध्ये तब्बल 5 हजार जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. कोरोनाव्हायरस पसरू नये, यासाठी देशातील शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आल्यात, शिवाय सांस्कृतिक कार्यक्रम आणि मोठ्या स्पर्धाही रद्द करण्यात आल्यात.
शेकडो देशातील हजारो नागरिकांना आपल्या विळख्यात घेणाऱ्या या कोरोनाव्हायरसने कैद्यांची सुटका केली आहे. इराणमधील तब्बल 70 हजार कैद्यांना जेलमधून सोडण्यात आलं आहे. इराणमध्ये कोरोनाव्हायरसमुळे 194 जणांचा मृत्यू झाला आहे. फक्त सोमवारी या व्हायरसने 49 जणांचा बळी घेतला. व्हायरसशी लढण्यासाठी इराण सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. व्हायरसची देशातील सद्य परिस्थिती पाहता कैद्यांना तुरुंगातून सोडण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे.
जगभरात या व्हायरसची लागण झालेले रुग्ण एक लाखापेक्षा जास्त आहेत. तर 4 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.