न्यूयॉर्क 03 एप्रिल : अमेरिकेत कोरोनाने कहर केलाय. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर मृतांच्या संख्येतही भर पडत आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनाला अटकाव करण्याचं औषध अजुन सापडलेलं नसल्याने सर्व जग त्याविरुद्ध लढत आहे. तर दुसऱ्या बाजूला जगात सर्वाधिक संपन्न असलेल्या अमेरिकेला जबर आर्थिक फटका बसला आहे. कोरोनामुळे सगळे व्यवहार थंडावल्याने लाखो लोकांना आपली नोकरी गमवावी लागत आहे. गेल्या दोन आठवड्यात तब्बल 1 कोटी लोक बेरोजगार झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय.
अमेरिका सरकारकडे आठवडाभरापूर्वी तब्बल 66 लाख लोकांनी बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज केला होता. तर त्यानंतरच्या आठवड्यात आणखी 33 लाख लोकांनी तसाच अर्ज केला आहे. अमेरिकेच्या इतिहासात बेरोजगारीचा हा उच्चांक असल्याचं बोललं जात आहे.
व्यवहार बंद असल्याने आणि मागणी घटल्याने अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. तर अनेक कंपन्यांनी मोठी कामगार कपात केली आहे. तोटा सहन करून कंपनी चालिण्याची ताकद कंपन्यांमध्ये राहिली नाही. तसं झालं तर राहिलेला व्यवसायही कोलमडून पडेल अशी भीती त्यांना वाटतेय. बेरोजगारांची ही अधिकृत संख्या असली तरी यापेक्षा जास्त लोक बेरोजगार असल्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.
कोरोना विषाणूसमोर अमेरिका असहाय्य दिसत आहे. एकाच दिवसात जास्तीत जास्त 1169 लोक मरण पावले आहे. एएफपी न्यूज एजन्सीने ही माहिती दिली आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे (COVID-19) मृत्यूची संख्या पाच हजाराहून अधिक झाली आहे आणि आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी (जेएचयू) च्या ताज्या अहवालानुसार अमेरिकेतील कोरोनामुळे न्यूयॉर्कला सर्वाधिक त्रास झाला आहे.
त्याच बरोबर न्यूयॉर्कचे गव्हर्नर एंड्रयू कुओमो यांनी अमेरिकेच्या इतर राज्यपालांना कोरोना विषाणूच्या साथीवर त्वरित कारवाई करण्यासाठी आवाहन केले आहे. त्याचबरोबर कुओमोने चेतावणी दिली की त्यांच्या शहरांमध्येही न्यूयॉर्कसारख्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, जिथे संक्रमणामुळे 16,000 लोक मारले जाऊ शकतात.
या महामारीविषयी पत्रकार परिषदेत कुओमोने गेट्स फाऊंडेशनशी संबंधित असलेल्या एका गटाकडून दिलेल्या मृत्यूच्या अंदाजाच्या आकडेवारीकडे लक्ष वेधलं. या अंदाजानुसार, 93000 अमेरिकन आणि 16000 न्यूयॉर्कर्स महामारी संपेपर्यंत मरण पावतील.