न्यूयॉर्क 02 एप्रिल : जगात अमेरिका आणि कोरोनाचं मुख्य केंद्र झालं आहे. अमेरिकत न्यूयॉर्क शहर कोरोनामुळे कोलमडून पडलंय. मृतांची संख्या एवढी आहे की हॉस्पिटल्समधल्या सगळ्या जागा कमी पडत आहेत. इतर शहरांमध्येही हीच परिस्थिती असल्याने मृतदेह झाकायला आणि ठेवायला शवपेट्या आणि ‘बॉडी बॅग’ कमी पडत आहेत. त्यामुळे मृतदेहांची विल्हेवाट लावायची कशी असा प्रशासनापुढे प्रश्न पडलाय. एकट्या न्यूयॉर्क शहरात 1,139 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत ही संख्या 5,115 एवढी झालीय. अमेरिकेत पुढच्या काही महिन्यांमध्ये तब्बल 2 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा साधनांचीही कमतरता आहे. सरकारने आपल्या आपत्कालीन साठ्यातून 50 हजार बॉडी बॅगची व्यवस्था करण्याची तयारी केली आहे. मात्र मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या बघता सरकारने आणखी 1 लाख बॅग्सची ऑर्डर दिली आहे. या बॅग 7.8 फुट लांब आणि 3.2 फुट रुंद असतात. युद्ध काळातल्या या बॅग आता कोरोनाविरुद्धच्या लढाईत वापरल्या जाणार आहेत. अमेरिकेत युद्ध काळात हिरव्या रंगाच्या नायलॉन बॅगमध्ये मृतदेहांना ठेवलं जातं. त्याच बॅगचा वापर आता केला जात आहे. लष्कराच्या विभागालाच अशा प्रकारच्या बॅग तातडीने उपलब्ध करून देण्याची विनंती प्रशासनाने केली आहे. वाचा - रुग्णांच्या मृत्यूनंतरही मरत नाही कोरोना तर…, तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा अमेरिकेत सध्या 2 लाख 16 हजार 154 लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर, 5 हजार 115पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान येत्या काळात मृतांच्या संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेतील एकूण रुग्णांच्या तब्बल 80% रुग्ण हे न्यूयॉर्कमध्ये आहेत. सध्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर सर्वात जास्त भार आहे. वाचा - तब्लिगी जमातमुळे तब्बल 9000 लोकांना कोरोनाचा धोका, केंद्राने जाहीर केली आकडेवारी यासंदर्भात, वैद्यकीय कर्मचार्यांनी कोरोनाविरूद्धच्या त्यांच्या लढाविषयी सांगितले की ते ते कसे झगडत आहेत. ख्रिश्चन फेल्ड्रान यांनी आपल्या अनुभवाबाबत सांगताना, “दिवसा कधी कधी रात्री मी रुग्णलयात असते. त्यामुळे घरातल्यांची सतत चिंता असते. मुलाला निरोप देते आणि मास्कने संपूर्ण चेहरा झाकते. तेव्हा एखाद्या लढाईला जात आहे, असा भास होतो, असे मत व्यक्त केले. अमेरिकेसारख्या महासत्ता देशाचे कोरोनाने कंबरडे मोडले आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या अमेरिकेत वाढत आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर सध्या कोरोनाचे नवीन केंद्र बनले आहे. दर 2.9 मिनिटाला न्यूयॉर्कमध्ये एकाचा मृत्यू होत आहे. परिस्थिती एवढी वाईट आहे की, रुग्णालयाजवळ मृतदेह ठेवण्यासाठी एक ट्रक उभा करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.