व्हेनिस 27 मार्च : युरोपात इटली आणि स्पेनची कोरोनामुळे पार वाताहत झाली आहे. सर्वच देश सध्या लॉकडाउन आहेत. नेमकं काय करायचं याचा सरकारला अंदाज येत नाही. बाधितांचा आणि मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. ही संख्या अंगावर काटा आणणारी असून मृतदेह ठेवायला हॉस्पिटल्समधली जागाही कमी पडते आहे. त्यामुळे नव्या पेशंट्सना जागा करून देण्यासाठी पेशंट गेल्यानंतर काही मिनिटांमध्येच त्याला तिथून हलवलं जातं. ते सगळे मृतदेह आता तात्पुरत्या शवगृहात ठेवण्यात आले आहेत.
शहरातजे जे मॉल्स बंद करण्यात आले होते त्या मॉल्सचं रुपांतर शवगृहात करण्यात आलं आहे. मृतांची संख्या दररोज वाढत असल्याने त्या प्रमाणात अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यातच व्हायरस पसरू नये म्हणून विशिष्ट प्रकारे काळजी घेतच त्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यामुळे आता वेटिंगलिस्ट तयार करण्यात आली आहे. हे सगळं काम आता लष्कराने हाती घेतलं असून लष्करी गाड्यांमधून मृतदेह नेण्यात येत आहेत.
दुर्दैव म्हणजे आपल्या जवळचा व्यक्ती गेल्यानंतर नातेवाईकांना त्यांना पाहता येत नाही किंवा त्यांचे अंत्यसंस्कारही करता येत नाहीत कारण त्यांना व्हायरसची बाधा होण्याची शक्यता असते. इटलीत आत्तापर्यंत 8,215 तर स्पेनमध्ये 4,365 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाची दहशत बघा, महिला शिंकली म्हणून दुकानदारानं फेकलं 26 लाखांचं सामान
चीन आणि इटली नंतर आता कोरोनाने अमेरिकेत थैमान घातलं आहे. अमेरिकेचे आर्थिक राजधानी असलेले न्यूयॉर्क शहर हे कोरोनाचं केंद्र आहे. दररोज बाधित आणि मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्ये आत्तापर्यंत 385 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 37 हजार रुग्णांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालंय.
सर्व अमेरिकेत कोरोनाबाधित असलेल्यांची संख्या 82 हजारांवर गेली असून त्याने चीनलाही मागे टाकलं आहे. तर सर्व अमेरिकेतल्या मृत्यूचा आकडा 1200 झाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास अमेरिकेत 80 हजार लोकांचा मृत्यू होवू शकतो अशी भीती Institute for Health Metrics and Evaluation ने (IHME) व्यक्त केली आहे.