चोंग्क्विंग, 20 फेब्रुवारी : संपूर्ण जग कोरोनाव्हायरसशी (Coronavirus) दोन हात करतं आहे. कोरोनाव्हायरसचे रुग्ण रुग्णालयात जीवनमृत्यूशी झुंज देत आहेत. मात्र अवघ्या 7 महिन्यांच्या चिमुरडीने या महाभयंकर अशा कोरोनाव्हायरसला हरवलं आहे. कोरोनाव्हायरस झालेल्या या चिमुरडीला आता उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Xinhua net ने दिलेल्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारीला या मुलीला कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं. चोंग्क्विंगमध्ये (Chongqing) कोरोनाव्हायरस झालेल्या रुग्णांमधील ही सर्वात कमी वयाची रुग्ण आहे. तिच्यावर चोंग्क्विंग नगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू होते.
चोंगक्विन आरोग्य विभागाचे शिआ पेई यांनी सांगितलं की, "रुग्णालयात या मुलीवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचं एक विशेष पथक स्थापन करण्यात आलं होतं. या मुलीवर योग्यप्रकारे उपचार झाले, ती आता कोरोनामुक्त झाले. त्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला"
हेदेखील वाचा - चिनी 'कोरोना'चा महाराष्ट्राला फटका, तब्बल 150 कोटींचं नुकसान
चीनमध्ये 2000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू
चीनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे आणखी 114 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या आता 2,118 झाली आहे. तर आणखी नव्या 1,749 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याने आता एकूण 74,576 रुग्ण झालेत. मात्र गेल्या काही दिवसापेक्षा कोरोनाव्हारसच्या नव्या प्रकरणांचं प्रमाण कमी झालं आहे, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली आहे. हुबेई प्रांतातील सर्वाधिक रुग्ण आहेत. याच प्रांतातील वुहानमधून कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाला.
जपानच्या क्रुझवर 8 भारतीयांना कोरोनाची लागणजपानच्या सागरी तटावर उभ्या असलेल्या डायमंड प्रिंसेस जहाजामधील 600 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 138 भारतीय प्रवासीही होते. एकूण 79 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाली, त्यामध्ये 8 भारतीयांचा समावेश आहे, अशी माहिती जपानमधील भारतीय दूतावासाने दिली आहे.
हेदेखील वाचा - Coronavirusचा कहर! क्रूझवरील 2 प्रवाशांचा मृत्यू तर 8 भारतीयांना कोरोनाची लागण