लंडन, 1 मार्च : दिवंगत माणसांबद्दल आदर व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती जगभरात आहेत. ती व्यक्ती आयुष्यात जिथं जाऊ इच्छित होती पण जाऊ शकली नाही अशा एखाद्या ठिकाणी, पर्वतावर किंवा नदीजवळ जाऊन काही नातेवाईक अस्थींचं विसर्जन करतात. तर काही जण पवित्र ठिकाणी गंगेत त्या विसर्जित करतात. मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ कुणी गरजूंना कपडे, मिठाई दान करतात, तर कुणी त्या व्यक्तीच्या आठवणी जागवतात. पण यूकेमधल्या भावंडांनी नुकतंच निधन झालेल्या आपल्या वडिलांच्या अस्थी त्यांच्याच आवडत्या बारमधील गटारात विसर्जित केल्या आहेत. हे कुटुंब दारुप्रेमी आहे आणि त्यांचे वडिल दिवंगत केविन मॅकग्लिंची यांच्या अस्थि त्यांनी बारच्या गटारात टाकल्या आहेत.
केविन यांची मुलं अस्थी विसर्जनासाठी हॉलीबुशला गेली आणि अस्थि विसर्जनापूर्वी त्यांनी अस्थी एका पिंटमध्ये टाकल्या. ओवन आणि कॅस्डी यांनी वडिलांना वचन दिलं होतं की ते त्यांची अंतिम इच्छा पूर्ण करतील. मृत्युपूर्वी काही वेळ केविन यांनी आपल्या मुलांना आपल्या मृत्युनंतर अस्थि या बारच्या गटारात टाकायची शेवटची इच्छा बोलून दाखवली. त्यामुळे त्यांच्या मुलांनी वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तसं केलंही.
केविनची मुलगी कॅस्डीने लॅड बायबल या वृत्तसंस्थेला माहिती दिली. ती म्हणाली, ‘माझे वडिल वारले तेव्हा ते 66 वर्षांचे होते आणि तो काळ आमच्या सगळ्यांसाठी खूपच कठीण होता. त्या बारमधील ड्रेन म्हणजे गटारात जावं अशी माझ्या वडिलांची इच्छा असल्याचं ते गेली अनेकवर्षं मला सांगत होते. ते जिवंत असताना कधीकधी असं करायचेही, कधीकधी त्या गटारात ते त्यांचे केस टाकायचे.’ वडिलांच्या चमचाभर अस्थी बिअर पिंटमध्ये टाकून त्या गटारात टाकतानाचा व्हिडीओही या भावंडांनी शूट करून ठेवला आहे.
हे मूर्खपणाचं वाटतंय पण मरताना त्यांची तीच शेवटची इच्छा होती. त्या गटारात जावं आणि तिथंच कायमचं वास्तव्य करावं, असं ओवन याने सांगितलं. खरंतर हा प्रकार 2018 मध्ये घडला आहे. पण आता इंटरनेटवर तो प्रचंड व्हायरल झाला असून याची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.
ओवन आपल्या वडिलांच्या अस्थी विसर्जन करत असताना त्यांचे कुटुंबीय बारच्या बाहेर जमले होते. ड्रेनेजच्या माध्यमातून मला सर्व स्थानिक मित्रांना भेटता येईल अशी वडिलांची इच्छा होती असं कॅस्डीनं सांगितलं. तुम्ही जेव्हा ड्रेनेज सिस्टिमकडे पाहाल तेव्हा तुम्हाला दरवेळी माझी आठवण होईल असं आमचे वडिल म्हणाले होते आणि आम्ही त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करू शकलो याचा आम्हाला अभिमान वाटतो असं ओवनने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.