वडील समजून भलत्याच व्यक्तीला घेतलं WhatsApp ग्रुपमध्ये; सहा महिन्यांनी उघडकीस आलं सत्य

वडील समजून भलत्याच व्यक्तीला घेतलं WhatsApp ग्रुपमध्ये; सहा महिन्यांनी उघडकीस आलं सत्य

एका व्यक्तीनं वडील समजून एका भलत्याच व्यक्तीला आपल्या कुटुंबाच्या व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये (Family WhatsApp Group) अॅड केलं. तब्बल सहा महिन्यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर भलत्याच व्यक्तीनं आपले कौटुंबिक गप्पा, संदेश वाचले याची जाणीव झाल्यानं कुटुंबियांना खूपच अवघडल्यासारखं वाटलं.

  • Share this:

मुंबई 27 फेब्रुवारी : व्हॉट्सअॅपमुळे (WhatsApp)कुटुंबातील व्यक्ती, मित्र मैत्रिणी, नातेवाईक, ऑफिसमधील सहकारी अशा वेगवेगळ्या स्तरावरील लोकांचा ग्रुप करून त्यावर संवाद साधणं, गप्पा मारणं हे आता नवीन नाही. व्हॉटसअॅपचा ग्रुप करण्यासाठी एक किंवा दोन व्यक्ती ज्यांना ग्रुपमध्ये घ्यायचे आहे, त्यांचे मोबाईल क्रमांक ग्रुपमध्ये अॅड करतात. समान नावाच्या एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर मात्र काळजी घेणं आवश्यक आहे अन्यथा जोनो हॉपकिन्ससारखी (Jono Hopkins) अवस्था होऊ शकते.

ब्रिटनमधील (UK)लेखक असलेल्या जोनो हॉपकिन्सनं नामसाधर्म्यामुळं आपले वडील समजून एका भलत्याच व्यक्तीला आपल्या कुटुंबाच्या व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये (Family WhatsApp Group) अॅड केलं. तब्बल सहा महिन्यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आला. भलत्याच व्यक्तीनं आपले कौटुंबिक गप्पा, संदेश वाचले याची जाणीव झाल्यानं हॉपकिन्स कुटुंबियांना खूपच अवघडल्यासारखं वाटलं. जोनोनं स्वतःच ट्विटरवर (Twitter) याबाबत माहिती देत लोकांनाही काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

सहा महिन्यांपूर्वी ब्रिटनमधील लेखक असलेल्या जोनो हॉपकिन्सनं कुटुंबातील सदस्यांचा एक व्हॉटसअॅप ग्रुप तयार केला. यात त्यानं आपले वडील पीटर, आई, बहिण यांचा समावेश केला. वडील पीटर यांचा मोबाईल क्रमांक घेताना त्याची काहीतरी गफलत झाली आणि चुकून दुसऱ्याच पीटर नावाच्या व्यक्तीचा या ग्रुपमध्ये समावेश झाला. त्यांच्या ग्रुपला सहा महिने झाले तरीही त्यांच्या लक्षातही आलं नाही की, भलत्याच व्यक्तीशी आपण आपले वडील म्हणून संवाद साधतोय.

एकदा जोनोनं वडिलांना फोन केला असता, काहीतरी महत्त्वाची गोष्ट माहित नसल्याचं सांगितलं. तेव्हा जोनो म्हणाला की, तुम्ही व्हॉटसअॅप ग्रुपवर आहात, तरी तुम्हाला हे कसं माहित नाही. तेव्हा त्याचे वडील म्हणाले, खरचं मी ग्रुपवर आहे, मला कसं माहित नाही ? यावर जोनो आणि त्याच्या बहिणीच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. मग त्यानं खऱ्या वडिलांना ग्रुपमध्ये अॅड केलं. कोणीतरी भलतीच व्यक्ती चुकून ग्रुपमध्ये अॅड झाली आणि तिनं आपले सगळे संदेश वाचले ही कल्पना जोनोला खूप अस्वस्थ करून गेली.

विशेषतः त्याच्या आईनं वडील समजून केलेल्या गप्पा या भलत्याच व्यक्तीशी होत्या, हे जाणवून तर त्याला खूपच ओशाळवाणं वाटलं.

24 फेब्रुवारी रोजी ट्विटरवर त्यानं स्वतःच आपल्या कुटुंबाचा एक फोटो शेअर करत ही माहिती दिली. लोकांनी त्याला उत्सुकतेनं विचारलं की, ती दुसरी व्यक्ती कोण होती ? त्यावर जोनोनं सांगितलं की ती व्यक्ती म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांच्या घरी मशीन दुरुस्तीसाठी आलेला पीटर नावाचा प्लंबर (Plumber) होता. त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

First published: February 27, 2021, 2:46 PM IST

ताज्या बातम्या