नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : भारताच्या दबावानंतर ब्रिटन सरकारनं कोव्हिशिल्ड लसीला (Britain approves Covishield but not Cowin certificate) मान्यता देण्याचा निर्णय घेतला असला तरी त्या देशात जाणाऱ्या भारतीय प्रवाशांच्या अडचणी तशाच असल्याचं समोर आलं आहे. कोव्हिशिल्डला ब्रिटननं मान्यता दिली असली, तरी कोविन सर्टिफिकेटला मात्र ब्रिटननं मान्यता दिलेली नाही. त्यामुळे भारतीय प्रवासी जेव्हा ब्रिटनमध्ये जातील, तेव्हा त्यांना तिथं कोरोना टेस्ट करून घेणं आणि विलगीकरणात राहणं (Corona test and quarantine mandatory) अनिवार्य असणार आहे.
मान्यता मिळूनही परिस्थिती कायम
ब्रिटनने आपातकालीन वापरासाठीच्या यादीत कोव्हिशिल्ड लसीचा समावेश केला आहे. मात्र भारतात लसीकरणानंतर दिल्या जाणाऱ्या cowin सर्टिफिकेटला मात्र मान्यता दिलेली नाही. म्हणजेच एखाद्या नागरिकाने जरी लसीकरण करून घेतले असेल तरी कोविन सर्टिफिकेटलाच मान्यता नसल्यामुळे भारतायांना ‘नॉट व्हॅक्सिनेटेड’ ठरवण्यात येणार आहे.
यादीत भारताचा समावेश नाही
ब्रिटनने जाहीर केलेल्या ताज्या धोरणानुसार 4 ऑक्टोबरपासून काही विशिष्ट देशांमधील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असेल, तर अशा नागरिकांना देशात थेट प्रवेश दिला जाणार आहे. मात्र या यादीत ज्या देशांचा समावेश आहे, त्यात भारताचे नाव नाही. याचाच अर्थ भारतात दिल्या जाणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीला मान्यता तर आहे, मात्र भारतातील सर्टिफिकेटला मान्यता नाही. त्यामुळे प्रत्यक्षात कोव्हिशिल्डचा मान्यता मिळाल्याचा काहीच फायदा भारतीय नागरिकांना होणार नसल्याचं चित्र आहे.
हे वाचा - तालिबान्यांनी जाहीरपणे फाडला पाकिस्तानचा झेंडा, वरून धमकीही दिली, पाहा VIDEO
भारताकडून प्रयत्न सुरू
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ब्रिटनच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर कोव्हिशिल्ड लसीला ब्रिटनने मान्यता दिली होती. आता कोविन सर्टिफिकेटलाही मान्यता मिळावी, यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी सांगितलं आहे. ही मान्यता कधी मिळते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Britain, Corona vaccine, Vaccination