काबुल, 2 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) प्रस्थापित होऊ घातलेल्या तालिबानच्या (Taliban) सत्तेचा काश्मीर प्रश्नात (Kashmir issue) वापर करण्याची स्वप्नं पाहणाऱ्या पाकिस्तानचा (Pakistan) भ्रमनिरास झाला आहे. तालिबानचं लक्ष हे अफगाणिस्तानच्या उभारणीवर असणार असून कुठल्याही देशाविरोधातील कारवायांमध्ये आमचा सहभाग नसेल, असं तालिबाननं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे काश्मीर प्रश्नी तालिबानने मदत करण्याची पाकिस्तानची अपेक्षा धुळीस मिळाली आहे. काय म्हणाले तालिबान? तालिबानचे नेते अनस हक्कानी यांनी भारताबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्याला दिल्लीसोबत सलोख्याचे संबंध ठेवण्याची इच्छा असून भारतानं तालिबानबाबतचे गैरसमज दूर करावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे. भारतीय माध्यमांमध्ये तालिबानचं चुकीचं चित्रण केलं जात असून परिस्थिती वेगळी असल्याचं हक्कानी यांनी सांगितलं. तालिबान सरकारला सर्व शेजारी देशांसोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यात रस असून भारतासोबत भविष्यात चांगले व्यापारी आणि राजकीय संबंध असतील, असं विधान त्यांनी केलं आहे. 20 वर्षांचा लढा अमेरिकेविरोधात तालिबाननं 20 वर्षे दिलेला लढा आता यशस्वी झाला असून राष्ट्राच्या उभारणीचं काम तालिबान करेल, असं हक्कानी यांनी म्हटलं आहे. तालिबानचा यापूर्वीदेखील कुठल्याही देशाला विरोध नव्हता. तालिबाननं इतर देशातील कुठल्याही प्रश्नात लक्ष घातलं नसून यापुढेदेखील तालिबानचं कार्यक्षेत्र हे अफगाणिस्तानच राहिल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. तालिबानने अमेरिकेसोबत दिलेला लढा हा देश स्वतंत्र करण्यासाठीचा लढा असल्याचं सांगत तालिबानचं लक्ष्य अफगाणिस्तानला इस्लामिक कायद्याच्या आधारे समृद्ध करणं, हेच असल्याचं म्हटलं आहे. हे वाचा - गिलानींना श्रद्धांजली वाहताना इम्रान खान यांचं वादग्रस्त ट्विट, ओकली गरळ भारताने दिला होता इशारा दोन दिवसांपूर्वीच भारताचे राजदूत आणि तालिबानचे प्रतिनिधी यांच्यात दोह्यात औपचारिक चर्चा झाली होती. यावेळी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी होऊ नये आणि अडकलेल्या भारतीयांची सुखरूप सुटका व्हावी, या दोन प्रमुख मागण्या भारताने केल्या होत्या. या दोन्ही मागण्यांना तालिबानने सकारात्मक प्रतिसाद दिला असून सर्व भारतीय अफगाणिस्तानमध्ये सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.