मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Bharat Biotech च्या covaxin मुळे ब्राझीलमध्ये पेटलं वादळ; नेमकं तिथं असं काय घडलं?

Bharat Biotech च्या covaxin मुळे ब्राझीलमध्ये पेटलं वादळ; नेमकं तिथं असं काय घडलं?

कोवॅक्सिन लशीच्या प्रकरणामुळे ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सानारो (jair bolsonaro) यांच्या अडचणी वाढू शकतात असं म्हटलं जातं आहे.

कोवॅक्सिन लशीच्या प्रकरणामुळे ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सानारो (jair bolsonaro) यांच्या अडचणी वाढू शकतात असं म्हटलं जातं आहे.

कोवॅक्सिन लशीच्या प्रकरणामुळे ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सानारो (jair bolsonaro) यांच्या अडचणी वाढू शकतात असं म्हटलं जातं आहे.

    ब्राझिलिया, 24 जून : भारताने तयार केलेली कोवॅक्सिन (covaxin) कोरोना लशीमुळे ब्राझीलमध्ये वादळ उठलं आहे. हैदराबादमधील भारत बायोटेकने (Bharat Biotech) तयार केलेली ही लस आहे. जी लस लवकरच भारतात लहान मुलांनाही दिली जाणार आहे. पण त्याआधीच या लशीबाबत ब्राझीलमधून (Brazil) महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

    ब्राझीलमध्ये भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिन (Bharat Biotech covaxin) खरेदी करण्याच्या करारामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणामुळे ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सानारो (jair bolsonaro) यांच्या अडचणी वाढू शकतात असं म्हटलं जातं आहे.

    रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने कोव्हॅक्सिन खरेदीसंदर्भातील अंतर्गत दबावाबद्दल राष्ट्रपतींना सतर्क केल्याचं तपासात कळलं आहे. या संपूर्ण प्रकाराबद्दल माहिती असलेल्या एका खासदाराने सांगितलं की, आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यावर भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक लस खरेदी करण्यासाठी दबाव आणला गेला होता.

    या प्रकरणाची चौकशी एक संसदीय समिती करत आहे. ब्राझील सरकारच्या एका सीनेट पॅनलने रसद विभागाचे अधिकारी लुइस रिकार्डो मिरांडा यांना बुधवारी साक्ष देण्यासाठी बोलावलं होतं. गेल्यावर्षी फायझर कंपनीच्या प्रस्तावांकडे दुर्लक्ष केल्यानंतर ब्राझीलच्या सरकारने महागड्या लशींसाठी भारत बायोटेकशी करार का केला, याची चौकशी सिनेट समिती आणि वकील करत आहेत. लुइस रिकार्डो मिरांडा यांनी याबद्दल वकिलांना माहिती देताना म्हटलं की, राष्ट्रपती जायर बोल्सानारो यांचे निकटवर्तीय आणि माजी आरोग्यमंत्री एडुआर्डो पज़ुएलो यांचे सहकारी अॅलेक्स लियाल मारिन्हो यांनी लस खरेदीसाठी त्यांच्यावर दबाव टाकला होता.

    हे वाचा - 'या' 11 देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचं थैमान, रुग्णांचा आकडा ऐकून बसेल धक्का

    ओ ग्लोबो वृत्तपत्रातील बातमीनुसार लुईस रिकार्डो मिरांडा यांनी 20 मार्चला पहिल्यांदा बोल्सोनारोंना या कागदपत्रांबाबत सांगितलं होतं. यावर राष्ट्रपतींनी त्यांना म्हटलं की, ते या विषयावर फेडरल पोलीस प्रमुखांशी बोलतील. या बैठकीत मिरांडांचे खासदार भाऊ लुईस मिरांडा देखील उपस्थित होते. त्यांनी बुधवारी रॉयटर्सला याबद्दलची माहिती दिली. दरम्यान, 'कोणत्याही कागदपत्रांशिवाय सार्वजनिक धन काढण्याचा हा प्रयत्न असल्याचं दिसतं आहे. शिवाय जास्त पैसे देऊन त्यातून कमाई करण्याचा त्यांचा हेतू असू शकतो,' अशी शंका खासदार लुईस मिरांडा यांनी व्यक्त केली.

    ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप अॅलेक्स लियाल मारिन्हो यांच्याबद्दल कोणतंच वक्तव्य करण्यात आलेलं नाही. बुधवारी एका पत्रकार परिषदेत बोल्सानारो यांचे सचीव ओइंग लोरेंजोनी आणि याबद्दल स्पष्टीकरण देताना लशीच्या करारात कोणताही दबाव टाकला गेला नसल्याचं म्हटलं. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे बोल्सानारो अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसंच मिरांडा यांनी केलेल्या आरोपांवर बोल्सानारो काय पावलं उचलतील, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मिरांडा बंधूंची शुक्रवारी पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. तसंच ब्राझीलच्या माजी आरोग्यमंत्र्यांचे सहकारी अॅलेक्स लियाल मारिन्हो यांनाही चौकशी समितीसमोर जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आलं आहे.

    हे वाचा - Antivirus बनवणाऱ्या John McAfee यांचं निधन; तुरुंगात गळफास घेत संपवलं जीवन

    अ‍ॅटर्नी जनरलच्या प्रेस कार्यालयाने पाठवलेल्या कागदपत्रांनुसार, भारत बायोटेक आणि ब्राझील आरोग्य मंत्रालय यांच्यातील कराराअंतर्गत मंत्रालयाला ब्राझीलमधील भारत बायोटेकचे प्रतिनिधी प्रेसिसा मेडिकॅमेन्टोस यांना 15 डॉलर प्रति डोसच्या या भावाने 32 कोटी डॉलर द्यावे लागणार होते. या करारावर फेब्रुवारीमध्ये स्वाक्षरी झाली होती.

    दरम्यान, भारत बायोटेकनं म्हटलं की, परदेशी सरकारसाठी लशीची किंमत प्रति डोस 15-20 डॉलर आहे. त्याच किंमतीत ब्राझीलबरोबरही करार झाला होता. फेब्रुवारीमध्ये ब्राझीलबरोबर करार करूनही भारत बायोटेकने लस पाठवली नाही. कारण कंपनीला ब्राझीलकडून अधिकृत मान्यता आणि औपचारिक खरेदी आदेशाची प्रतीक्षा आहे. तर भारत बायोटेकला अद्याप पैसे दिले गेले नाहीत, असं ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं असून या प्रकणाची कायदेशीर चौकशी सुरू आहे.

    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus, World news