बार्सिलोना, 24 जून: अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख व्यक्तिमत्व आणि अँटीव्हायरस (Antivirus) क्षेत्रातील महामेरू McAfee चे संस्थापक जॉन मॅकॅफी (John McAfee) यांनी तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या (Commits suicide in jail) केली आहे. मागील 9 महिन्यांपासून ते तुरुंगात शिक्षा भोगत होते. त्यामुळे नैराश्य आल्यानं त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याचं स्पष्टीकरण त्यांचे वकील झेवियर विलाब्ला यांनी दिलं आहे. जॉन मॅकॅफी यांच्या आत्महत्येनं अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचं व्यक्तीमत्व हरवलं आहे.अलीकडेच स्पेनमधील हायकोर्टानं त्यांच्या प्रत्यार्पणाला मंजुरी देण्यात आली होती.
McAfee चे संस्थापक जॉन मॅकॅफी यांनी अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलं होतं. 75 वर्षीय मॅकॅफी यांनी जगातील पहिल्या व्यावसायिक अँटीव्हायरसची निर्मिती केली होती. पण अलीकडेच त्यांच्यावर करचोरीचा आरोप करण्यात आला होता. त्याचबरोबर टेनेसी आणि क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याबाबतही न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे बऱ्याच काळापासून विविध देशांचे पोलीस त्यांच्या मागावर होते. दरम्यान मागील वर्षी 3 ऑक्टोबर रोजी जॉन मॅकॅफी यांना बार्सिलोना विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं होतं.
मागील काही वर्षांपासून जॉन मॅकॅफी अमेरिकेच्या तपास यंत्रणांपासून पळ काढत होते. काही काळ ते आपल्या यॉटवरही राहिले आहेत. मॅकॅफी यांनी NASA, Xerox आणि लॉकहीड मार्टिन यांसारख्या अग्रगण्य कंपन्यांसाठी काम केलं होतं. 1987 मध्ये त्यांनी जगातील पहिलं कमर्शिअल अँटी-व्हायरस बनवलं होतं. त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रांत त्याचं नाव मोठं झालं होतं.जॉन यांनी 2011 मध्ये आपली सॉफ्टवेअर कंपनी इन्टेलला विकली होती. मात्र, सॉफ्टवेअर प्रोग्रॅम अजूनही त्यांच्याच नावानं सुरू आहे. सध्याच्या घडीला जगात 50 कोटी ग्राहक जॉन यांच्या अँटी व्हायरसचा वापर करतात.
हेही वाचा-अमेरिकेच्या उद्योगाने समुद्रात भूकंप! 18000 किलोचा बाँब फोडला; पाहा VIDEO
काही वैचारिक कारणांमुळे आपण अमेरिकेला आयकर देत नसल्याचं त्यांनी 2019 मध्ये म्हटलं होतं. त्याचबरोबर "जर अमेरिकेत मला दोषी ठरवलं गेलं, तर मला संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावं लागेल," अशी भीती त्यांनी मागील महिन्यात सुनावणीदरम्यान कोर्टासमोर व्यक्त केली होती. माझ्यावर झालेला अन्याय स्पॅनिश कोर्टाला दिसेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. पण स्पेनच्या हायकोर्टानं त्यांच्या प्रत्यार्पणाची मंजुरी दिली होती. त्यामुळे निराशा झाल्यानं त्यांनी तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.