मुंबई, 09 नोव्हेंबर: कोरोना विषाणूने जवळपास गेल्या दोन वर्षांपासून जगभरात थैमान घातले आहे. त्यानंतर कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू झाले होते, मात्र यावर खऱ्या अर्थाने यश मिळाले ते म्हणजे जगभरात लसीकरण सुरू झाल्यानंतर. जगभरातील सर्वच देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. तर अनेक ठिकाणी लोकांनी लस घ्यावी याकरता चांगल्या ऑफर्स देखील दिल्या (Exciting offers for Vaccination) जात आहेत. दरम्यान, एका ऑस्ट्रेलियन महिलेचं नशीब कोरोनाची लस घेतल्यानंतर (Australian Girl Becomes Millionaire) फळफळलं आहे. या महिलेने लस मिळाल्यानंतर लॉटरी पद्धतीने भाग घेतला आणि लस मिळाल्यानंतर ती करोडपती बनली.
डेली मेल ऑस्ट्रेलियाच्या वृत्तानुसार, 25 वर्षीय जोआन झूने (Joanne Zhu) गेल्या महिन्यात मिलियन डॉलर वॅक्स लॉटरीमध्ये (Million Dollar Vax campaign) भाग घेतला आणि 5.4 कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले. ऑस्ट्रेलियात कोरोना लशीचा प्रचार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि सेवाभावी संस्थांनी लॉटरी प्रणाली तयार केली आहे. ज्यामध्ये 27,44,974 ऑस्ट्रेलियन लोकांनी नोंदणी केली होती. लॉटरी प्रणालीमध्ये सहभागी झालेल्या सर्व लोकांना 31 ऑक्टोबरपर्यंत पहिला डोस आधीच मिळाला होता. झू देखील लाखो लोकांमध्ये सामील झाली होती आणि लस घेतल्यानंतर ती करोडपती बनली आहे.
हे वाचा-सावधान! माणसांपाठोपाठ आता पाळीव प्राण्यांमध्ये आढळला कोरोनाचा 'अल्फा' व्हेरिएंट
लस घेण्यापूर्वी तिने असा विचारही केला नव्हता की तिच्या या छोट्याशा कृतीमुळे ती करोडपती बनेल. ही लॉटरी देण्यासाठी अधिकाऱ्यांनी जेव्हा तिला पहिल्यांदा फोन केला तेव्हा जोआनने फोन देखील उचलला नव्हता. दरम्यान आता ही लॉटरी जिंकल्यानंतर ती खूप आनंदी आहे आणि या पैशांचं काय करायचं हे देखील तिने ठरवलं आहे. जोआनने मीडियाशी बोलताना सांगितले की लकी ड्रॉचा चेक मिळाल्यानंतर ती कुटुंबातील सदस्यांना भेटवस्तू देईल आणि तिच्या भविष्यासाठी गुंतवणूक करेल. त्याच वेळी, जोआनने असेही सांगितले की जर चीनी नवीन वर्षादरम्यान सीमा उघडल्या तर तिला तिच्या कुटुंबासह फर्स्ट क्लास तिकिटावर प्रवास करायला आवडेल. याशिवाय तिला फाइव्ह स्टार हॉटेल देखील बुक करायचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona patient, Corona vaccination, Corona vaccine cost