नवी दिल्ली 06 नोव्हेंबर : गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगाला विळख्यात घेतलं होतं. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाची धास्ती पसरली असून हा आजार आपल्याला होऊ नये, यासाठी सर्वचजण आवश्यक ती काळजी घेताना दिसतात. माणसांसोबत प्राण्यांनादेखील कोरोनाची (COVID-19) लागण झाल्याचे दिसून आले. कोरोनाचे 'अल्फा', 'डेल्टा' असे विविध व्हेरियंट (Corona Variants) आहेत. यापैकी कोरोना विषाणूचा 'अल्फा' व्हेरियंट (Alpha Variant Found in Animals) हा तर आता माणसासोबत प्राण्यांमध्ये आढळून आला आहे. लाइव्ह हिंदुस्तानने याबाबत वृत्त दिलं आहे.
माणसांनंतर आता कोरोनाचा 'अल्फा' व्हेरियंट प्राण्यांमध्येही आढळून आला आहे. पशुवैद्यकीय रेकॉर्डनुसार (Veterinary Records) एका नवीन अभ्यासात असे समोर आले आहे की, पाळीव प्राणीदेखील SARS-CoV-2 च्या 'अल्फा' व्हेरियंटने संक्रमित होऊ शकतात. 'अल्फा' व्हेरियंट प्रथम दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये आढळला. हा व्हेरियंट 'यूके व्हेरियंट' (UK variant) किंवा 'B.1.1.7.1' म्हणून देखील ओळखला जातो.
वायू प्रदूषणामुळे वाढू शकतो कोरोनाचा प्रसार; या व्यक्तींना अधिक धोका, वाचा कारण
'अल्फा' व्हेरियंट इंग्लंडमध्ये वेगाने पसरला आहे. अभ्यासात असं सांगण्यात आले आहे की, 'कोरोनाचा अल्फा व्हेरियंट पाळीव प्राण्यांमध्येही आढळून येत आहेत. या अनुषंगाने दोन मांजरी आणि एका कुत्र्याची पीसीआर चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. तर, इतर दोन मांजरी आणि एका कुत्र्यामध्ये हृदयविकाराची लक्षणं दिसू लागल्यानंतर दोन ते सहा आठवड्यांनी त्यांच्यात अँटिबॉडीज दिसून आल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.
या अभ्यासाचे प्रमुख लेखक लुका फेरासिन म्हणाले, 'आमच्या अभ्यासात कोविड -19 अल्फा व्हेरियंटने मांजरी आणि कुत्रे संक्रमित झाल्याचे दिसून आले आहे. तसेच या प्राण्यांना SARS-CoV-2 ची लागण होऊ शकते. जे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते.'
दरम्यान, हे पाळीव प्राणी आजारी पडण्याच्या काही आठवड्यांपूर्वी त्यांच्यात श्वसनासंबंधी कोरोनाची लक्षणं विकसित झाली होती. त्यांची कोविड -19 साठी चाचणी झाली. या सर्व पाळीव प्राण्यांमध्ये गंभीर मायोकार्डिटिस आजार दिसून येत आहे. तसंच त्यांच्यामध्ये हृदयविकाराची सुरुवात दिसून आली आहे.
कोरोनानं पुन्हा काढलं डोकं वर? 53 देशांनी वाढवली चिंता, नव्या लाटेची शक्यता
कोरोना हा फक्त माणसांमध्ये पसरणारा रोग आहे, असं काही दिवसांपूर्वी मानलं जात होतं. पण जेव्हा प्राण्यांना देखील कोरोनाचे संक्रमण झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. यानंतर पाळीव प्राण्यांना कोरोनाचा कितपत धोका आहे, हा मुद्दाही चर्चेत आला होता. पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी, यावर तज्ज्ञांनी मते मांडली होती. त्यातच आता प्राण्यांमध्ये कोरोनाचा 'अल्फा' व्हेरियंट आढळला आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांची अधिकच काळजी त्यांच्या मालकांना घ्यावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Corona updates