सिडनी, 01 जानेवारी : ऑस्ट्रेलियात रेडिओएक्टिव्ह कॅप्सूल हरवल्यानंतर आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. या कॅप्सूलचा शोध घेण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून देशातील सर्व यंत्रणा कार्यरत होती. अखेर ही शोध मोहिम संपली असून कॅप्सूल बुधवारी सापडली. यासाठी जवळपास 1400 किमीचा महामार्ग सुरक्षा यंत्रणांनी पिंजून काढला. कॅशियम 137 ही कॅप्सूल बुधवारी सापडली असल्याची माहिती पश्चिम ऑस्ट्रेलियाकडून देण्यात आली.
शोध मोहिम करणाऱ्या पथकाचे अद्ययावत डिटेक्शन यंत्रणा असलेले वाहन महामार्गावरून जात असताना कॅप्सूल एका परिसरात असल्याचा अलर्ट आला. त्यानतंर पोर्टेबल डिटेक्शन साधनांच्या मदतीने याचा शोध घेतल्यानंतर त्या परिसरात रस्त्याकडेला दोन मीटर अंतरावर कॅप्सूल पडलेली सापडली. पश्चिम ऑस्ट्रेलियाचे इमर्जन्सी सर्विस मिनिस्टर स्टेफन डेवसॉन यांनी पत्रकार परिषदेत कॅप्सूल सापडल्याची माहिती दिली. कॅप्सूल सापडल्यानंतर त्याबाबतची खात्री लष्कराकडून करण्यात आली असून त्यानंतर सुरक्षा यंत्रणेकडे गुरुवारी कॅप्सूल सोपवण्यात येणार आहे.
हेही वाचा : काय सांगता? मासा खाणं महागात, तब्बल 15 लाखांचा दंड; पण का पाहा VIDEO
अर्ध्या सेंटीमीटर पेक्षा थोडी मोठी कॅप्सूल
सिल्व्हर रंगाची असलेल्या कॅप्सूलचा आकार 6 एमएम डायामीटर आणि 8 एमएम उंच इतका आहे. यामध्ये कॅशियम 137 असून त्यातून उत्सर्जित होणारी किरणे ही प्रतितास 10 एक्स रे इतकी आहेत. कॅप्सूल हरवल्यानंतर ऑस्ट्रेलियन सरकारने संशयित आणि अज्ञात दिसल्यास त्यापासून पाच मीटर अंतरावर राहण्याचे आदेश नागरिकांना दिले होते.
कॅप्सूल नीट न हाताळल्याने दंड
दरम्यान, कॅप्सूलच्या वाहतुकीत केलेल्या हलगर्जीपणाबद्दल स्टेट रेडिएशन सेफ्टी कायद्यानुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते. सध्या यासाठी सुरक्षित हाताळणी न केल्याबद्दल 780 डॉलर म्हणजेच जवळपास 64 हजार रुपये तर पुढे प्रत्येक दिवसाला 35 डॉलर म्हणजेच 2900 रुपये इतका दंड आहे. आता या दंडात आणखी वाढ करण्याचा विचार करत असल्याचं ऑस्ट्रेलियन सरकारने म्हटलंय.
हेही वाचा : काहीही! महिलांचे ब्रेस्ट ते रोमान्स यावरही Tax; या विचित्र करांबाबत तुम्हाला माहिती आहे का?
न्यूक्लिअर सिक्युरीटी एजन्सीही शोधमोहिमेवर
रेडिओअॅक्टिव्ह कॅशियम 137 असलेल्या या कॅप्सूलचा वापर खाणकामासाठी केला जातो. ऑस्ट्रेलियात 10 जानेवारीला रेडिओ अॅक्टिव्ह कॅप्सूल घेऊन निघालेला ट्रक 16 जानेवारीपर्यंत पोहचणं अपेक्षित होतं. खाणीत पोहचण्याआधी ऑस्ट्रेलियाच्या न्यूमॅन आणि पर्थ या दोन शहरांच्या दरम्यान कॅप्सूल हरवली. ही बाब 25जानेवारीला आल्यानंतर ऑस्ट्रेलियन सरकारने अलर्ट जारी केला होता. तसंच ऑस्ट्रेलियाच्या न्यूक्लिअर सिक्युरीटी एजन्सीलाही पाचारण करण्यात आलं होतं.
किती धोकादायक आहे कॅप्सूल?
रेडिओएक्टिव्ह कॅशियम 137 या कॅप्सूलमधून गॅमा आणि बेटा या दोन प्रकारच्या किरणांचे उत्सर्जन होतं. कॅप्सूलमधून बाहेर पडणाऱ्या घटकांचं प्रमाण हे तासाभरात 10 एक्सरे इतकं असून त्यामुळे कॅप्सूलच्या संपर्कात येणाऱ्याच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. शिवाय, हाय रेडिएशन गॅमा किरणे असल्यानं कर्करोगाचाही धोका आहे. जर याचे थोडे जरी प्रमाण श्वासावाटे किंवा खाण्यातून शरीरात गेले तर मांसपेशीवर परिणाम होऊन कर्करोगाचा धोका संभवतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia