नवी दिल्ली, 12 जुलै : इंटरनेट (Internet) हे प्रत्येकाच्या मुलभूत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं (Freedom of expression) प्रतिक असून त्याच्यावर कुठलेही निर्बंध (Restrictions) असणं, ही भविष्याच्या दृष्टीनं चिंतेची बाब असल्याचं गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी म्हटलं आहे. जगातील अनेक देशांमध्ये मोफत आणि स्वतंत्र असलेल्या (Free internet) इंटरनेटला काही शक्तींचा विरोध असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे. ही बाब चिंताजनक असून इंटरनेटवर कुठल्याही व्यक्तीची किंवा संस्थेची मालकी असू शकत नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.
पिचाईंचा रोख कुणाकडे?
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा रोख नेमका कुणाकडे, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. पिचाई यांनी या विधानातून अप्रत्यक्षपणे चीनवर निशाणा साधल्याचं मानलं जात आहे. मात्र चीनमध्ये गुगलची कुठलीही उत्पादनं सेवा पुरवत नाहीत, असं पिचाईंनी अगोदरच म्हटलं आहे. त्यामुळेच कदाचित चीनवर अप्रत्यक्ष टीका करण्याचा प्रयत्न गुगलकडून होत असल्याचं मानलं जात आहे.
इंटरनेट विरोधकांना जनतेनंच थोपवावं
इंटरनेट हा नवा प्राणवायू आहे. प्रत्येकाच्या अविष्कार स्वातंत्र्यासाठी आवश्यक असणारा इंटरनेट हा मूलभूत घटक आहे. त्याच्यावर कुणी नियंत्रण आणण्याचा किंवा एकछत्री मालकी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असेल, तर सामान्यांनीच तो प्रयत्न हाणून पाडायला हवा,असं पिचाई यांनी म्हटलं आहे. भारत सरकारच्या नव्या माहिती तंत्रज्ञान कायद्याबाबतही पिचाईंनी या विधानाद्वारे भाष्य केल्याचं काही नेटिझन्सचं म्हणणं आहे. मात्र गुगलने अगोदरच भारतातील या नियमांची अंमलबजावणी केली असल्यामुळे तशी शक्यता नसल्याचंही बोललं जात आहे.
हे वाचा - आकाशातच विमानाचा दरवाजा उघडायला गेली आणि पुढे असं काही घडलं की...; पाहा VIDEO
स्थानिक कायद्यांचा आदर
गुगल जगातील अऩेक देशांना सेवा देत असून त्या त्या देशातील नियम आणि कायद्यांचं पालन करण्याची भूमिका आपण नेहमीच स्विकारली असल्याचं पिचाई यांनी म्हटलं आहे. नियमांचं पालन केलं, तरी ज्या ठिकाणी मूलभूत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते, त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम आपलं आहे आणि ते आपण करतच राहू, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google, Internet, Sundar Pichai