लंडन, 25 जानेवारी: युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (UK PM Boris Johnson) यांचा आणखी एक ‘पार्टी प्रताप’ (One more party) समोर आला आहे. स्वतःच्याच वाढदिवशी (Birthday) पंतप्रधानांच्या निवासस्थानी (PM Residence) झालेल्या पार्टीचे तपशील पुढे आले असून त्यात स्वतः पंतप्रधानही हजर (Present) असल्याचं सिद्ध झाल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या (Resignation) मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवशी त्यांना सरप्राईज देण्यासाठी 30 पेक्षा अधिक कर्मचारी एकत्र आल्यामुळे नियमांचा भंग झाल्याचं दिसून आलं आहे.
काय आहे प्रकरण?
19 जून 2020 या दिवशी पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय 10, डाऊनिंग स्ट्रीटच्या कर्मचाऱ्यांनी घेतला. त्यासाठी पंतप्रधान दिवसभराचं काम संपवून आल्यानंतर त्यांना सरप्राईज देण्यासाठी केक कटिंग सेरेमनीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी युकेमधील कोरोनाचा पहिला लॉकडाऊन अंशतः शिथिल होत होता. अत्यावश्यक सेवा तर सुरुच होत्या शिवाय काही इतर दुकानांनाही सेवा सुरू करण्याची सशर्त परवानगी देण्यात येत होती. बार, पब आणि थिएटर्स मात्र अद्यापही बंदच होती आणि दोन पेेक्षा अधिक लोकांना कुठल्याही कारणासाठी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली होती.
पंतप्रधानांकडून नियमभंग
पंतप्रधानांच्या वाढदिवशी रात्री आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत 30 पेक्षा अधिक लोक एकत्र आले होते आणि त्या पार्टीला स्वतः पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीदेखील काही मिनिटांसाठी हजेरी लावली होती, अशी माहिती आहे. अमेरिकेतील ITV News नं ही माहिती समोर आणली आहे.
सरकारनं माहिती फेटाळली
30 पेक्षा अधिक लोक एकत्र आले, ही बातमी चुकीची असल्याचा दावा पर्यावरण सचिव जॉर्ज युस्टीस यांनी फेटाळून लावला आहे. त्या दिवशी कॅबिनेट रुममध्ये केक कापण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला 10 पेक्षाही कमी लोक उपस्थित होते, असा दावा त्यांनी केला आहे. वाहतूक सचिवांनीदेखील न्यूज चॅनलचा दावा फेटाळला आहे. साधारण 10 पेक्षा कमी लोक यावेळी उपस्थित होते आणि जे लोक दिवसभर त्याच कार्यालयात काम करत होते, त्यांनीच एकत्र येत या केक कटिंग सेरेमनीचं पंतप्रधानांसाठी आयोजन केलं होतं, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
हे वाचा- उतारवयात येणारा थकवा ही मृत्यूचीच चाहूल, नव्या संशोधनातील निष्कर्ष
राजीनाम्याच्या मागणीनं धरला जोर
अगोदरच अनेक पार्ट्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आता पक्षातूनही होऊ लागली आहे. ब्रिटन राजपुत्राच्या मृत्यूवेळी राष्ट्रीय दुखवटा असतानाही पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पार्टी केल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर आता ही नवी पार्टी समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Lockdown, Prime minister, Uk