इस्लामाबाद 06 जानेवारी : पाकिस्तानचे
(Pakistan) पंतप्रधान इम्रान खान
(Imran Khan) यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) या पक्षाने परदेशी नागरिक आणि कंपन्यांकडून मिळालेल्या पक्ष निधीची संपूर्ण माहिती देशाच्या निवडणूक आयोगाला दिली नाही. पक्षाच्या बँक अकाउंट संबंधित माहितीदेखील निवडणूक आयोगापासून लवपून ठेवली. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने
(Election Commission Pakistan) संकलित केलेल्या अहवालाच्या आधारे बुधवारी स्थानिक माध्यमांनी हा दावा केला आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या (ECP) छाननी समितीने संकलित केलेल्या अहवालाचा हवाला देत सत्ताधारी पक्षाने आर्थिक वर्ष 2009-10 ते 2012-13 या चार वर्षांच्या कालावधीत 31 कोटी 20 लाख पाकिस्तानी रुपयांच्या पक्षनिधी संबंधित माहिती लपवल्याचे वृत्त डॉन वृत्तपत्राने दिले आहे.
जमियत-ए-उलेमा-ए-इस्लामचे
(JUI) प्रमुख फजलुर रहमान यांनी या मुद्द्यावरून इम्रान खान यांच्या पक्षावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, 'जर सर्व पाकिस्तानी राजकारण्यांच्या चुकीच्या कृत्यांची गणना केली तरी त्यांची तुलना पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या भ्रष्टाचाराशी होऊ शकत नाही. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ हा चोरांचा पक्ष आहे. राजकारणात शिवीगाळ करण्याची संस्कृती आणणारा हा एकमेव पक्ष आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी निवडणूक आयोगापासून 53 बँक अकाउंटची माहिती लपवली आहे,' असा दावाही त्यांनी केला.
वृत्तपत्रांनी केला मोठा खुलासा
स्थानिक वृत्तपत्रानी दिलेल्या वृत्तानुसार, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने (SBP) निवडणूक आयोगाच्या समितीला दिलेल्या माहितीनुसार,पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफची (PTI) 26 बँक अकाउंट होती. समितीच्या अहवालात म्हटले आहे की, '2008 ते 2013 या काळात पक्षाने निवडणूक आयोगाला 1.33 अब्ज पाकिस्तानी रुपयांची माहिती दिली होती. तर पाकिस्तानच्या केंद्रीय बँक एसबीपीच्या एका अहवालानुसार वास्ताविक ही रक्कम 1.64 अब्ज पाकिस्तानी रुपये आहे.'
1400 हून अधिक कंपन्यांनी पक्षाला दिला निधी
पाकिस्तानमधील सुमारे 1,414 कंपन्या, 47 परदेशी कंपन्या आणि 119 संभाव्य कंपन्यांनी खान यांच्या पक्षाला निधी दिल्याचे अहवालात म्हटले आहे. अमेरिकेतून 23 लाख, 44 हजार, 800 डॉलर मिळाल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, समितीला पक्षाच्या अमेरिकन बँक अकाउंटची माहिती मिळवता आली नाही. पक्षाला निधी देणाऱ्यांमध्ये 4,755 पाकिस्तानी, 41 गैर-पाकिस्तानी आणि 230 परदेशी कंपन्यांचा समावेश आहे.
अमेरिकेशिवाय खान यांच्या पक्षाला दुबई, यूके, युरोप, डेन्मार्क, जपान, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया येथून निधी प्राप्त झालाय. परंतु समितीला या व्यवहारांची माहिती देण्यात आली नाही, असेही अहवालात म्हटले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी मंगळवारी एका बैठकीत चौकशी समितीचा अहवाल "चुकीचा" असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी या विरोधी राजकीय पक्षांच्या बँक अकाउंटची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केलीय.
डॉन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार पाकिस्तानी निवडणूक आयोगाने मंगळवारी सत्ताधारी पक्षाविरुद्ध परदेशी निधी प्रकरणी नऊ महिन्यांनंतर सुनावणी सुरू केली होती. तेव्हाच हा अहवाल सादर करण्यात आला. याप्रकरणी पुढील सुनावणी 18 जानेवारीला होणार आहे. दरम्यान, इम्रान खान यांच्या पक्षावर मिळालेल्या निधीबाबत माहिती लपवल्याचा आरोप लागल्यामुळे पाकिस्तानमधील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधक आमने-सामने आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.