मराठी बातम्या /बातम्या /विदेश /भारतीय महिलेनं सिंगापूरमध्ये मोलकरणीला अनन्वित छळ करून मारलं; आता आयुष्यभर फोडणार खडी

भारतीय महिलेनं सिंगापूरमध्ये मोलकरणीला अनन्वित छळ करून मारलं; आता आयुष्यभर फोडणार खडी

Representative Image

Representative Image

इतकी क्रूरता कधी पाहिली नसेल! धक्काबुक्की, मारहाण, उपाशी ठेवणं एवढंच नाही तर गुरासारखं बांधून ठेवणं आणि कचऱ्याच्या डब्यातलं अन्न खायला लावण्यासारखं क्रूर कृत्य या भारतीय बाईने केल्याचा तिच्यावर आरोप आहे. या पापांचा पाढा कोर्टात CCTV च्या दाखल्याने वाचण्यात आला.

पुढे वाचा ...

सिंगापूर, 25 फेब्रुवारी :  एका भारतीय वंशाच्या महिलेने तिच्या घरात कामाला असलेल्या नोकर महिलेचा किती अनन्वित अत्याचार केला, याचा CCTV फुटेजच्या पुराव्यासह सिंगापूरच्या कोर्टात दाखला देण्यात आला, तो ऐकून विश्वास बसणार नाही. धक्काबुक्की, मारहाण, उपाशी ठेवणं एवढंच नाही तर गुरासारखं बांधून ठेवणं आणि कचऱ्याच्या डब्यातलं अन्न खायला लावण्यासारखं क्रूर कृत्य या बाईने केल्याचा तिच्यावर आरोप आहे. या अपरिमित शारीरिक आणि मानसिक छळामुळे म्यानमार वंशीर मोलकरीण अखेर मृत्युमुखी पडली. आता या भारतीय वंशाच्या महिलेला आजन्म खडी फोडायला लागू शकते.

म्यानमार वंशीय (Myanmar Origin) महिला नोकरावर (Maid) अत्याचार करून तिला ठार मारल्याचा आरोप सिंगापूरमधील  भारतीय वंशाच्या (Indian Origin) गायत्री मुरुगन या 40 वर्षीय महिलेवर ठेवण्यात आला आहे. मयत व्यक्ती 24 वर्षांची होती. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु असून लवकरच आरोपीला शिक्षा सुनावण्यात येईल. याप्रकरणी फिर्यादीने म्हटलं आहे की गायत्री मुरुगन या महिलेने आपल्या महिला नोकराचा अनन्वित छळ केला, तिला उपाशी ठेवले आणि अत्याचार करुन तिला ठार मारलं

हत्या, उपासमार, गंभीर दुखापत, तापलेल्या वस्तूने चटके देणे आदी कारणांमुळे म्यानमार वंशीय नोकर महिलेचा मृत्यू झाला असून या प्रकरणी गायत्री मुरुगन हिच्यावर 28 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी गायत्री मुरुगनला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. तसंच या व्यतिरिक्त 87 गुन्ह्यांसाठी देखील शिक्षेचा विचार केला जाणार असल्याचं, एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हणलं आहे.

न्यूज एशिया चॅनेलच्या वृत्तानुसार, गायत्री मुरुगन या महिलेने घरकामासाठी महिला नोकराची नेमणूक केली होती. पाच महिन्यानंतर गायत्री मुरुगन हिने या मोलकरणीचं वजन निव्वळ 24 किलो असतानाही तिला उपाशी (starved) ठेवलं.

पियांग नगाईह डॉन असे या मोलकरणीचं नाव असून, गळ्यावरील जखमा आणि मेंदूला दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या एक दिवस आधी तिला उपाशी ठेवण्यात आले, तसेच रात्रीच्या वेळी तिला खिडकीच्या लोखंडी जाळीला बांधून ठेवण्यात आलं. यावेळी या नोकर महिलेने कचऱ्याच्या डब्यातील अन्न खाण्याचा प्रयत्न केला असता, तिला मारहाण करण्यात आली, असं अहवालात म्हटलं आहे.

अवश्य वाचा -   India Toy Fair: भारतीय खेळण्यांचा पहिला उत्सव 27 फेब्रुवारीपासून, डिजिटल प्रदर्शन आणि बरंच काही असणार

गरीब परिस्थिती त्यातच तीन वर्षाच्या मुलाचे संगोपन या कारणांमुळे मे 2015 मध्ये ही पीडित महिला गायत्री मुरुगनकडे नोकरी करण्यासाठी सिंगापूरला आली होती. त्यानंतर या महिला नोकरावर लक्ष ठेवण्यासाठी घरामध्ये सीसीटिव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्यात आले होते. या कॅमेरामधील फुटेजनुसार मृत्यूपुर्वीचे 35 दिवस या महिला नोकर आणि तिच्या मुलावर अत्याचार करण्यात आल्याचे न्यायलयातील सुनावणीदरम्यान सांगण्यात आले.

शवविच्छेदन अहवालानुसार, पीडित महिलेच्या शरीरावर 31 चट्टे, 47 बाह्य जखमा झाल्या होत्या. मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने तसेच हायपोक्सिक इस्केमिक एन्सेफॅलोपॅथीमुळे (Hypoxic Ischamic Encephalopathy)  तिचा मृत्यू झाला. पीडित महिला जन्मतःचा अशक्त होती. त्यात तिची उपासमार झाली होती. तिला अजून काही काळ उपाशी ठेवलं असतं तर ती त्याच्यामुळेच मरण पावली असती, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

फिर्यादीपक्षाकडून न्यायालयात बाजू मांडताना वरिष्ठ कौन्सिल मोहम्मद फैजल यांच्या नेतृत्वात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची मागणी करण्यात आली. ते म्हणाले, की अशा प्रकारे होणारी हानी आणि समाजातील लोकांकडून केले जाणारे असे कृत्य बघता या गुन्हासाठी ही एकमेव शिक्षाच योग्य आहे.

गायत्रीने ज्या प्रकारे महिला नोकराचा छळ केला, तिला उपाशी ठेवलं, तिच्यावर अत्याचार करुन तिला ठार मारलं यामुळे विवेकाला धक्का बसल्याचे फैजल यांनी म्हटलं आहे.

याप्रकरणी शिक्षेची सुनावणी पुढील तारखेला होणार आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी जन्मठेप आणि कॅनिंग किंवा 20 वर्षांपर्यंत कारावास, दंड आणि कॅनिंग (Canning) अशी शिक्षा होऊ शकते. परंतु महिला गुन्हेगारास कॅनिंगची शिक्षा दिली जात नसल्याचे अहवालात म्हटलं आहे.

गायत्रीच्या पतीवर देखील महिला नोकरावर अत्याचार केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

First published:
top videos

    Tags: Court, Crime news, Singapore