• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • Explainer: जगातील सर्वांत मोठी स्कूटर फॅक्टरी; प्रत्येक दुसऱ्या सेकंदाला तयार होणार एक गाडी

Explainer: जगातील सर्वांत मोठी स्कूटर फॅक्टरी; प्रत्येक दुसऱ्या सेकंदाला तयार होणार एक गाडी

जगातली सर्वांत मोठी स्कूटर फॅक्टरी असणार आहे. या फॅक्टरीचं एकूण क्षेत्र 500 एकरवर विस्तारलेलं असून, त्यापैकी 43 एकर क्षेत्रांवर प्रत्यक्ष बांधकाम असेल. ओला कंपनीने डिसेंबर 2020 मध्ये तमिळनाडू सरकारसोबत 2400 कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 11 मार्च : शहरी नागरिकांच्या आयुष्यात ओला कॅब (Ola Cab) हा आता अत्यंत महत्त्वाचा घटक झाला आहे. आता ओला ही कंपनी जगातली सर्वांत मोठी टू-व्हीलर फॅक्टरी (Mega Two Wheeler Factory) उभारणार आहे. तमिळनाडूतल्या (Tamilnadu) कृष्णगिरी जिल्ह्यातल्या 500 एकर जागेवर ही फॅक्टरी उभारणार असल्याची घोषणा या कॅब अ‍ॅग्रिगेटर कंपनीने अलीकडेच केली असून, 2022 पर्यंत ती सुरू होणार आहे. 'द इंडियन एक्स्प्रेस'ने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ओला फ्युचर फॅक्टरी (Ola FutureFactory) - जगातली सर्वांत मोठी स्कूटर फॅक्टरी असणार आहे. या फॅक्टरीचं एकूण क्षेत्र 500 एकरवर विस्तारलेलं असून, त्यापैकी 43 एकर क्षेत्रांवर प्रत्यक्ष बांधकाम असेल. 'ओला'च्या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ही फॅक्टरी तिच्या पूर्ण क्षमतेने चालू लागेल, तेव्हा प्रत्येक दोन सेकंदांना एक स्कूटर या फॅक्टरीतून बाहेर पडेल. म्हणजेच वर्षाला 1 कोटी स्कूटर्स या फॅक्टरीतून निर्माण होतील. हे प्रमाण जगातल्या सध्याच्या टू-व्हीलर उत्पादनाच्या 20 टक्के एवढं असेल. पहिल्या वर्षात 20 लाख स्कूटर्स - पहिल्या टप्प्यात वर्षाला 20 लाख स्कूटर्सची निर्मिती करण्याची या मेगा फॅक्टरीची क्षमता असेल. ओलाच्या इलेक्ट्रिक, तसंच अन्य टू-व्हीलर्सच्या (Electric Two Wheelers) उत्पादनासाठीचा हा जागतिक पातळीवरचा हब असेल. येथून भारतासह युरोप, ब्रिटन, लॅटिन अमेरिका, एशिया पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आदी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही स्कूटर्स पाठवल्या जाणार असल्याची माहिती ओला कंपनीकडून देण्यात आली आहे.

(वाचा - हे स्मार्ट हेल्मेट घातल्याशिवाय बाईक स्टार्ट होणार नाही; पाहा भन्नाट VIDEO)

फॅक्टरीच्या आवारात जंगलही - ही फॅक्टरी उभारताना त्या प्रदेशातल्या हरित पट्ट्याला बाधा येणार नाही, याची काळजी घेणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे. तसंच, प्रत्यक्ष बांधकाम होणार असलेल्या ठिकाणची झाडं काढून दुसरीकडे लावली जाणार आहेत. या फॅक्टरीच्या विशाल आवारात मोठं जंगलक्षेत्र (Forest Area) असण्याच्या दृष्टीनेही कंपनीने नियोजन केलं असून, त्या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर बाहेर आलेली माती आणि खडक फॅक्टरीच्या आवारातच वापरले जाणार आहेत. ओला कंपनीने डिसेंबर 2020 मध्ये तमिळनाडू सरकारसोबत 2400 कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला आहे. तसंच जानेवारी 2021 मध्ये जमीन अधिग्रहण पूर्ण झालं आहे. फॅक्टरीचा पहिला टप्पा येत्या काही महिन्यांत कार्यरत होईल, असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे. 10 हजार रोजगार - या फॅक्टरीच्या माध्यमातून तब्बल 10 हजार रोजगारांची (Jobs) निर्मिती होणार आहे. 'ओला'ने दिलेल्या माहितीनुसार, 'फॅक्टरीमध्ये इंडस्ट्री 4.0 ची (Industry 4.0) तत्त्वं अंतर्भूत केली जाणार असून, ओला कंपनीने स्वतः तयार केलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनचा वापर त्यासाठी केला जाणार आहे. सर्व यंत्रणांमध्ये तंत्रज्ञानाचा शक्य तितका वापर केला जाणार आहे.'

(वाचा - इथे होते Royal Enfield Bullet ची पूजा, वाचा अनोख्या मंदिराची कहाणी)

सर्वांत मोठी ऑटोमेटेड फॅक्टरी ही फॅक्टरी देशातील सर्वांत मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित यंत्रणा (Automated) वापरणारी फॅक्टरी ठरणार आहे. पूर्ण क्षमतेने काम करू लागल्यावर या फॅक्टरीत जवळपास 5 हजार रोबोट्स (Robots) आणि स्वयंचलित वाहनं कार्यरत असतील, असा अंदाज आहे. 'येत्या काही महिन्यांत कार्यरत होणार असलेल्या या जगातल्या सर्वांत मोठ्या स्कूटर फॅक्टरीसाठी जागतिक पातळीवरील भागीदार आणि पुरवठादारांसोबतही करार झाले आहेत,' अशी माहितीही कंपनीने दिली आहे. इलेक्ट्रिक स्कूटर्सची निर्मिती - येत्या काही महिन्यांत ओला कंपनी या फॅक्टरीतून इलेक्ट्रिक स्कूटर्सची निर्मिती करणार आहे. ही स्कूटर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून, डिझाइनसाठी तिला आधीच पुरस्कार मिळाले असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. रिमूव्हेबल (काढता येण्यासारखी) बॅटरी आणि उच्च कार्यक्षमता ही या स्कूटरची वैशिष्ट्यं असतील, असंही कंपनीने म्हटलं आहे.
First published: