नवी दिल्ली, 26 डिसेंबर : कोरोनाचं (Covid19) संकट जगभरात अजूनही सुरूच आहे. काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याने लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे. अनेक देशांमध्ये लशीला परवानगी देण्यात आली असून लसीकरणाला (Vaccination) सुरुवात देखील झाली आहे. ब्रिटन आणि अमेरिकेत लसीकरणाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून अनेक देश या प्रक्रियेत आघाडीवर आहेत. भारतात देखील लवकरच लशीला परवानगी मिळणार आहे. त्याआधी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन अॅप लाँच केलं असून यामध्ये जगभरातील नागरिकांना कोरोना संदर्भात अपडेट मिळणार आहेत.
या अॅपचं वैशिष्ट्य म्हणजे यात जगभरातील सर्व देशांतील आकडेवारी मिळणार असून प्राथमिक लक्षणांपासून ते गंभीर लक्षणांविषयी माहिती यात देण्यात येणार आहे.
WHO Covid-19 Updates हे अॅपचं नाव असून नायजेरियामधील नागरिकांसाठी हे अॅप उपलब्ध करून देण्यात आलं आहे. परंतु जगभरातील सर्व नागरिकही अॅप डाऊनलोड करू शकणार आहेत. यात दररोजची आकडेवारी आणि माहिती दिली जाणार आहे. जगभरात कोरोनाविषयी चुकीची माहिती आणि अफवा पसरवल्या जातात. यामुळे नागरिकांना याचा फटका बसू नये आणि योग्य माहिती पोहोचावी या उद्देशाने हे अॅप तयार करण्यात आल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली आहे.
यात केवळ आकडेवारी आणि बातम्या मिळणार असून कोणत्याही प्रकारची टेस्ट करण्याच्या सूचना तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग फीचर देण्यात आलेलं नाही. जगभरात अनेक देशांनी आणि राज्यांनी आपल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी असे अनेक अॅप तयार केले होते. यामध्ये विविध लक्षणांची माहिती देण्याबरोबरच ही लक्षणं असल्यास चाचणी करण्याची देखील सूचना देण्यात येत आहे. पण डब्ल्यूएचओच्या अपमध्ये तसं नाही.
दरम्यान, हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही सिस्टीमवर चालणार आहे. यात जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा आणि दररोज वाढणाऱ्या पॉझिटिव्ह नागरिकांची आकडेवारी मिळणार असून नागरिकांची दिशाभूल करणारी चुकीची आकडेवारी जाऊ नये यासाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. जनजागृती हे देखील साथरोग नियमनासाठीची महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळेच डब्ल्यूएचओने हे जनजागृतीचं पाऊल उचललं आहे. लोकांना अधिकृतपणे यात माहिती मिळाल्यावर त्यांच्या मनात कोणतीच संदिग्धता राहणार नाही.