वॉशिंग्टन, 27 फेब्रुवारी : सध्या अनेक ऑनलाइन डेटिंग अॅप (Online Dating App) उपलब्ध आहेत. या अॅपवर अनेक लोकांना आपल्या आवडीच्या व्यक्ती भेटत असतात. अनेकदा या ऑनलाइन साइटवर डेटिंग करत असताना महिला किंवा पुरुष आपली खरी ओळख लपवून ठेवतात. यामुळे मोठ्या समस्याही निर्माण होतात. अमेरिकेत अशीच एक घटना समोर आली असून, एका महिलेला जोडीदाराचं सत्य कळल्यानंतर तिनं बदला (Revenge) घेण्याचं निश्चित केलं आणि त्यासाठी एक अफलातून शक्कल लढवली. त्यामुळे या फसव्या प्रियकराचं पितळ सर्वांसमोर उघडं पडलं. अमेरिकेतील अटलांटा (Atlanta) इथल्या नादिया (Nadia) नावाच्या महिलेला टिंडर (Tinder) या डेटिंग अॅपवर एरीक (Eric) नावाचा मित्र मिळाला. त्याचं नातं फुलू लागलं. मात्र एरिकनं आपली खरी माहिती इथं दिलीच नव्हती. त्याचं लग्न झालं असल्याचं तसंच त्याला 6 मुलंदेखील असल्याचं त्यानं लपवून ठेवलं होतं. नादियाबरोबर आपलं नातं मैत्रीच्या पुढं नेण्याची इच्छा त्यानं प्रदर्शित केली. टिकटॉकवरील (TikTok) त्यांच्या चॅटिंगचे काही स्क्रिनशॉट व्हायरल झाले आहेत. त्यावर नादियानं तू कुणाला डेट करत आहेस का किंवा नात्यामध्ये आहेस का ? असं विचारलं, त्यावर त्यानं आपण कोणत्याही नात्यामध्ये नसल्याचं खोटंच सांगितलं. यानंतर या दोघांनी शनिवारी भेटण्याचा निर्णय घेतला. मात्र या दरम्यान, नादियानं एरिकविषयी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्या वेळी फेसबुकवर (Facebook) त्याच्याविषयी सगळी खरी माहिती मिळाली. एरीक हा विवाहित आणि सहा मुलांचा पिता असल्याचं सत्य नादियाला कळलं. फेसबुकवर तिला एरिकचा त्याच्या पत्नीबरोबरचा फोटोही आढळून आला. मागील अडीच वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत असून सात महिन्यांपूर्वी त्यांनी लग्न केल्याचं तिला आढळून आलं.
(वाचा - WhatsApp वर डिलिट झालेले मेसेज कसे वाचाल; हा आहे पर्याय )
हे सत्य उघडकीस येताच नादिया चांगलीच चिडली. या फसवणुकीबद्दल तिनं एरिकचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. मात्र यासाठी तिनं एक वेगळा मार्ग निवडला. एरिकला तिने आपल्या भेटीच्या वेळी एखाद्या महिलेला बरोबर आणण्याची विनंती केली. एरिक या मागणीनं गोंधळला, पण त्याने होकारही दिला. त्याचा होकार ऐकल्यावर नदीयानं त्याला त्याच्या पत्नीसोबतचा फोटो पाठवला आणि ती आपल्यासोबत स्पेशल गेस्ट असेल असं म्हटलं. यावर एरिक गोंधळून गेला. परंतु आपल्याविषयी तिला समजलं असल्याचं त्याच्या लक्षात आलं. यावर एरिकनं आपण खूप वाईट मानसिक स्थितीतून जात असल्यानं सत्य लपवल्याचं सांगितलं.
(वाचा - नवं Dating App लाँच; डेटिंगसोबतच मिळणार टिकटॉकसारखी सुविधा,जाणून घ्या वैशिष्ट्यं )
द सनमध्ये आलेल्या वृत्तानुसार, अनेक नेटीजन्सनी नादियाच्या या कृत्याचं कौतुक केलं आहे. एकानं याच कारणामुळं ऑनलाइन डेटिंग थांबवलं असल्याचं म्हटलं आहे.