नवी दिल्ली, 17 डिसेंबर : भारतीय बाजारात पबजी मोबाईल इंडिया (PUBG Mobile India) सुरू करण्याच्या वाढत्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MEITY) याबाबत मोठा खुलासा केला आहे. भारतात पबजी मोबाईल पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली नसल्याचं, केंद्राने स्पष्ट केलं आहे.
सप्टेंबरमध्ये भारतात पबजीसह अनेक शंभरहून अधिक अॅप्सवर बंदी घालण्यात आली. दरम्यान आरटीआयच्या (RTI Query) प्रश्नाला उत्तर देताना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने पबजी मोबाईल भारतात सुरू करण्यास कोणतीही परवानगी दिली नसल्याचं, घोषित केलं आहे. 30 नोव्हेंबर रोजी पबजी मोबाईलबाबत आरटीआय क्वेरी दाखल करण्यात होती आहे. त्याला उत्तर देताना केंद्राकडून हा खुलासा करण्यात आला आहे.
ई-स्पोर्ट्स संस्था जीईएम ई-स्पोर्ट्सने (GEM Esports) त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर आरटीआयचं उत्तर शेअर केलं आहे.
'सप्टेंबर 2020 मध्ये भारत सरकारने Ministry of Electronics and Information Technology (MEITY) विभागाच्या सल्ल्यानुसार विविध चिनी अॅप्सवर बंदी घातली. त्यापैकी बंदी घालण्यात आलेला एक पबजी मोबाईल गेम होता. आता हा गेम भारतात पुन्हा सुरू केला जाण्याची चर्चा आहे. आता विशेषत: भारतीय लोकांसाठी हा गेम बनवण्यात आला असून तो देशासाठी आणि नागरिकांसाठीही हानिकारक नसल्याचं बोललं जात आहे. आपल्या विभागाकडून अशाप्रकारे पबजी मोबाईल गेम पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे का?' असा प्रश्न आरटीआयद्वारे दाखल केलेल्या क्वेरीमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत विभागाने PUBG सुरू करण्यासाठी अशाप्रकारची कोणतीही परवानगी दिली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
यापूर्वी Insidesport ने दिलेल्या अहवालानुसार, PUBG कॉर्पोरेशनचे अधिकारी एक महिन्याहून अधिक काळ इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी बैठकीसाठी विचारणा करत आहेत, परंतु अद्यापही त्यांना सरकारकडून नियुक्ती मिळालेली नाही. परवानगी मिळण्यास विलंब म्हणजे PUBG Mobile India भविष्यात भारतीय बाजारात लाँच होणार नाही.
'PUBG भारतात पुन्हा लाँच करण्यासाठी योग्य प्रयत्न केले गेले, परंतु या प्रकरणात कोणतीही प्रगती झालेली नाही. किमान मार्च 2021 पर्यंत तरी गेम भारतात कमबॅक करेल, याची सध्या कोणतीही चिन्ह दिसत नसल्याचं', पबजी अधिकाऱ्यांनी Insidesport ला दिलेल्या माहितीत सांगितलं आहे.