मुंबई, 9 सप्टेंबर- स्मार्टफोन उत्पादन करणारी दिग्गज कंपनी असलेल्या सॅमसंगने (Samsung) अलीकडेच 200 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर (200 MP Camera Sensor) सादर केला होता. त्या कॅमेऱ्याला ISOCELL HP1 असं नाव देण्यात आलं होतं. तो कॅमेरा असलेला फोन अद्याप ग्राहकांच्या भेटीला यायचा आहे. तेवढ्यातच सॅमसंगने तब्बल 576 मेगापिक्सेल क्षमतेच्या कॅमेऱ्याची निर्मिती सुरू केली आहे. आतापर्यंत अनेक मोबाइल कंपन्यांनी 108 मेगापिक्सेल क्षमतेचा कॅमेरा असलेले स्मार्टफोन्स सादर केले आहेत. त्यासाठी त्या कंपन्यांनी पिक्सेल बायनिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे.
सॅमसंगने याच तंत्रज्ञानात सुधारणा करून ISOCELL HP1 हा सेन्सर विकसित केला. त्या तंत्रज्ञानाला ChameleonCell असं नाव देण्यात आलं आहे. आता सॅमसंग 576 मेगापिक्सेलचा कॅमेरा कसा विकसित करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
SEMI युरोप समिट 2021 मध्ये सॅमसंग कंपनीचे एसव्हीपी आणि ऑटोमोटिव्ह सेन्सर विभागाचे प्रमुख हयेचांग ली यांनी एक प्रेझेंटेशन सादर करताना कॅमेरा सेन्सरचा रोडमॅप या संदर्भात एक स्लाइड दाखवली. सॅमसंग कंपनी 2025पर्यंत 576 मेगापिक्सेल कॅमेरा मार्केटमध्ये उतरू शकते, असं त्या वेळी सांगण्यात आलं. सॅमसंग 2025पर्यंत 576 मेगापिक्सेल कॅमेरा मार्केटमध्ये प्रवेश करण्याचं नियोजन करत असल्याबद्दल GizChina च्या एका वृत्तातही सांगण्यात आलं आहे.
(हे वाचा: जगातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन JioPhone Next उद्या लाँच होणार,काय असेल किंमत)
2021च्या अखेरपर्यंत 108 मेगापिक्सेल हे स्मार्टफोनसाठी स्टँडर्ड रिझॉल्युशन (Standard Resolution) होऊन जाईल, असंही त्या स्लाइड शोमधून स्पष्ट झालं.
यासाठी वापरण्यात आलेली पिक्सेल बायनिंग टेक्नॉलॉजी (Pixel Bining Technology) 200 मेगापिक्सेलच्या ISOCELL HP1 कॅमेऱ्यात वापरण्यात आली आहे. हा कॅमेरा तीन प्रकारच्या लेआउटमध्ये असतो. टू बाय टू, फोर बाय फोर आणि फुल पिक्सेल असे ते तीन लेआउट्स आहेत. हा कॅमेरा प्रखर प्रकाशासोबतच मंद प्रकाशात फोटोग्राफी करण्यासाठीही अत्यंत उत्तम ठरेल. ISOCELL HP1 हा कॅमेरा 8K व्हिडिओ 30 फ्रेम पर सेकंद या दराने मिनिमम व्ह्यू लॉससह शूट करू शकतो.
हा कॅमेरा सेन्सर चार बाजूंच्या पिक्सेल्स मर्ज करून रिझॉल्युशन 50 मेगापिक्सेल किंवा 8192X6144 आणि 8k म्हणजेच 7680X4320 रिझॉल्युशनचे व्हिडिओज रिझॉल्युशन कमी न करता शूट करू शकतो.
(हे वाच: तुमच्या फोनमधून लगेच डिलीट करा हे Mobile App, अन्यथा बसेल मोठा फटका)
स्मार्टफोन्सशिवाय अलीकडे कोणाचंही पान हलत नाही. स्मार्टफोन्स हा आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग होईल असं काही वर्षांपूर्वी कोणी सांगितलं असतं, तर अजिबात खरं वाटलं नसतं. तसंच, या कालावधीत तंत्रज्ञान आणखी प्रगत होत चाललं आहे. त्यामुळे स्मार्टफोन्सच्या किमतींच्या तुलनेत त्यात मिळणाऱ्या फीचर्समध्ये बरीच वाढ झाली आहे. पूर्वी 30-35 हजार रुपये मोजूनसुद्धा मिळत नव्हती, एवढी फीचर्स आता 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोन्समध्येही सहज मिळतात. मोठा डिस्प्ले, पाच किंवा सहा हजार mAh क्षमतेची दमदार बॅटरी, तसंच 48 ते 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा अशी फीचर्स असलेले फोन्सही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होऊ लागले आहेत. आता सॅमसंग म्हणतंय त्याप्रमाणे आधी 200 आणि मग 576 मेगापिक्सेल क्षमतेचा कॅमेरा असलेले स्मार्टफोन्स नजीकच्या भविष्यकाळात बाजारात येऊ घातले आहेत. त्यामुळे फोटोची क्लॅरिटी किती उत्तम असेल, हे वेगळं सांगायला नको.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Samsung, Technology