नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : रिलायन्स जिओ (Reliance Jio) ही भारतातली प्रमुख टेलिकम्युनिकेशन कंपनी आहे. जिओ फोन लॉन्च करून कंपनीने फोन निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे. काही दिवसांपूर्वीचं कंपनीने आपला JioPhone Next हा बजेट स्मार्टफोन लॉन्च केला. फोन उत्पादनानंतर आता जिओ स्वतःचा लॅपटॉप (Jio Laptop) आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मीडिया टेक (MediaTek) MT8788 SoC प्रोसेसर असलेला जिओ बुक (JioBook) गीकबेंच (Geekbench) या प्लॅटफॉर्मवर दिसला आहे. गीकबेंचवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, जिओ बुकमध्ये Android 11 ऑपरेटिंग सिस्टम आणि 2 जीबी RAM असण्याची शक्यता आहे.
यापूर्वी हा लॅपटॉप ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या (BIS) सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला होता. मॉडेल नंबरचा आधर घेऊन असं सांगितलं जात आहे, की या लॅपटॉपचे तीन वेरिएंट मिळतील. मिळालेल्या माहितीनुसार, जिओचा हा लॅपटॉप Snapdragon X12 4G मॉडेमसोबत जोडलेल्या Qualcomm Snapdragon 665 SoC प्रोसेसरवर चालेल.
काही दिवसांपूर्वी, NB1118QMW, NB1148QMW आणि NB1112MM या मॉडेल क्रमांकांचे जिओ बुक बीआयएसवर दिसले होते. यापैकी NB1112MM या क्रमांकाचा जिओ बुक आता गीकबेंचवर उपलब्ध आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कंपनी या लॅपटॉपचं इंटर्नल टेस्टिंग करत आहे. येत्या काही महिन्यांत हा लॅपटॉप बाजारात येऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्याचे काही फीचर्सदेखील समोर आले आहेत.
2 GB रॅम आणि मीडियाटेक प्रोसेसर -
गीकबेंचवर दिसत असलेल्या NB1112MM क्रमांकाच्या जिओ बुकमध्ये 2 GB रॅम (RAM) आहे. त्यात प्रोसेसर म्हणून मीडिया टेक MT6788 चिपसेट मिळण्याची शक्यता आहे. जिओ बुक अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. जिओ बुकला गीकबेंचच्या सिंगल-कोर टेस्टमध्ये 1178 आणि मल्टी-कोअर टेस्टमध्ये 4246 गुण मिळाले आहेत.
एक्सडीए (XDA) डेव्हलपर्सच्या अहवालानुसार, जिओ नोटबुकमध्ये 1366×768 पिक्सेल रिझोल्युशनसह HD डिस्प्ले आहे. डिस्प्लेच्या आकाराबद्दल मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. XDA ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की, जिओ बुक Snapdragon 665 चिपसेटसह येईल. यासोबत कंपनी 4G कनेक्टिव्हिटीसाठी Snapdragon X12 मॉडेमदेखील देईल.
टॉप वेरिएंटमध्ये मिळेल 4 GB रॅम -
जिओ बुकचं बेसिक मॉडेल 2 GB LPDDDR 4x रॅम आणि 32 GB eMMC स्टोरेजसह उपलब्ध होऊ शकतं. टॉप-एंड वेरिएंटमध्ये 4 GB LPDDR 4x रॅम आणि 64 GB eMMC 5.1 स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, 4G LTE व्यतिरिक्त, ड्युअल-बँड वाय-फाय आणि HDMI यांसारखे ऑप्शन जिओ बुकमध्ये उपलब्ध असतील, असं अपेक्षित आहे.
जिओ बुकचे फीचर्स समोर आले असले, तरी अद्याप त्याच्या किमतीबाबत कोणतीही माहिती नाही. जिओने स्वस्त दरांमध्ये फोन उपलब्ध करून दिलेले आहेत. लॅपटॉपच्या बाबतीतदेखील रिलायन्स तेच धोरण अवलंबणार का, याबाबत उत्सुकता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.