उत्तर प्रदेश, 18 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदीय क्षेत्र वारासणीमधून एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. काही लोकांनी पंतप्रधानांच्या संसदीय कार्यलयाला विक्रीसाठी ओएलएक्स (OLX) वर टाकल्याचा प्रकार उघड झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या संसदीय कार्यालयाचा फोटो काढून तो OLX वर टाकण्यात आला आणि याची किंमत तब्बल 7.5 कोटी रुपये सांगण्यात आली. OLX वर देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये, पंतप्रधान कार्यालयातील आतील संपूर्ण माहिती, खोल्या, पार्किंगच्या सुविधेसह इतर गोष्टींबाबतही माहिती देण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर, OLX वरून ही जाहिरात हटवण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी FIR दाखल केली असून चार जणांना ताब्यात घेतलं आहे. ज्या व्यक्तीने फोटो काढून OLX वर टाकला होता, त्यालाही अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
पीएम मोदींनी आपल्या संसदीय क्षेत्रात कार्यालय तयार केलं असून अनेक लोक येथे त्यांच्या समस्या घेऊन येतात. पंतप्रधानांचं हे कार्यालय वारासणीतील भेलूपुर भागात आहे.