Home /News /technology /

सावधान! 533 दशलक्ष Facebook वापरकर्त्यांचे फोन नंबर आणि खासगी डेटा लीक, भारतीयांचाही समावेश

सावधान! 533 दशलक्ष Facebook वापरकर्त्यांचे फोन नंबर आणि खासगी डेटा लीक, भारतीयांचाही समावेश

फेसबुक वापरकर्त्यांचे फोन नंबर आणि पर्सनल डेटा ऑनलाईन लीक (Phone Numbers and Personal Data of Facebook Users) झाला आहे. यात तब्बल 106 देशांमधील लोकांचा डेटा लीक (Data Leak) झाला आहे.

    मुंबई 04 एप्रिल : शनिवारी जवळपास 533 दशलक्ष फेसबुक वापरकर्त्यांचे फोन नंबर आणि पर्सनल डेटा ऑनलाईन लीक (Phone Numbers and Personal Data of Facebook Users) झाला आहे. या लीक झालेल्या डेटामध्ये लोकांची खासगी माहितीही ऑनलाईन मोफत उपलब्ध झाली आहे. यात तब्बल 106 देशांमधील लोकांचा डेटा लीक (Data Leak) झाला आहे. यात यूएसमधील 32 दशलक्ष, यूकेमधील 11 दशलक्ष आणि भारतातील 6 दशलक्ष वापरकर्त्यांचा समावेश आहे. नेमकं काय झालं लिक - या लीक डेटामध्ये फोन नंबर, फेसबुक आयडी, संपूर्ण नाव, लोकेशन, जन्मतारीख, बायो आणि काहींचे ईमेल आयडीही लीक झाले आहेत. बिझनेस इनसाइडरशी बोलताना फेसबुकच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, 2019 मध्ये पॅच केलेल्या सोशल नेटवर्किंग साइटमधील असुरक्षिततेमुळे डेटा स्क्रॅप केला गेला. सायबर क्राइम इंटेलिजंस फर्म हडसन रॉकचे सीटीओ अलन गॅल म्हणाले की, हा लीक डेटा कितीतरी वर्ष जुना असू शकतो. मात्र, लोकांची फसवणूक करण्यासाठी लोकांची वैयक्तिक माहिती वापरणाऱ्या सायबर गुन्हेगारांना या डेटाच्या माध्यमातून बहुमोल माहिती मिळू शकेल. त्यामुळे, ही बाब गंभीर आहे.  गॅलने शनिवारी सर्वात आधी लीक केलेला संपूर्ण डेटा ऑनलाइन शोधला. गॅल यांनी सांगितलं, की अनेक वापरकर्त्यांचे फोन नंबर आणि खासगी माहिती लीक झाली असून याचा वापर हॅकर्स चुकीच्या गोष्टींसाठी, सोशल इंजिनिअरिंग अटॅक आणि हॅकींगसाठी करू शकतात. फेसबुकच्या म्हणण्यानुसार, लीक झालेला पूर्ण डेटा हा 2019 च्या आधीचा आहे. डेटा लीक झाल्यानंतर सर्वकाही ठीक करण्यात आलं होतं. मात्र, जाणकारांच्या म्हणण्यानुसार जुन्या डेटाच्या आधारेही हॅकर्स वापरकर्त्यांचं नुकसान करू शकतात.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Facebook, Privacy leak, User data

    पुढील बातम्या