नवी दिल्ली, 28 मार्च : सध्या अनेक वाहन कंपन्यांनी मार्च अखेर आपल्या वाहनांवर घसघशीत सवलत (Discounts) जाहीर केली आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांना सवलतीच्या किंमतीत आपली आवडती कार विकत घेण्याची संधी मिळत आहे. या स्पर्धेत जपानी वाहन उत्पादक कंपनी निस्सानही (Nissan) आघाडीवर आहे. निस्सानने आपल्या किक्स (Kicks) या एसयूव्हीवर (SUV) चक्क 95 हजारांपर्यंतची भरघोस सवलत जाहीर केली आहे. अर्थात ही सवलत 31 मार्चपर्यंतच किंवा केवळ वाहनांचा साठा उपलब्ध असेपर्यंतच मिळणार असल्यानं ही सुवर्णसंधी ग्राहकांसाठी ठरू शकते.
कंपनीनं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रोख सवलतीसह (Cash Discount), एक्सचेंज बोनस (Exchange Bonus) आणि लॉयल्टी बोनस (Loyalty Bonus) आदी सवलतीही जाहीर केल्या आहेत. त्यामुळे निस्सानची ही ‘बीएस6’ (BS-6) निकषांना पात्र ठरणारी एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी ही अगदी योग्य वेळ आहे. सर्व सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँका, कंपन्यांच्या कर्मचार्यांसाठी निस्साननं एलटीसी ऑफर दिली असून, वेगवेगळी व्हेरिएंट्स आणि ठिकाण यानुसार ऑफर वेगवेगळी आहे.
कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर (Compact SUV) ग्राहकांना देण्यात येणारे एकूण लाभ 95 हजार रुपयांपर्यंत आहेत. यामध्ये 25 हजार रुपये रोख सवलत, 50 हजार रुपये एक्सचेंज बोनसचा समावेश असून, 20 हजार रुपयांचा अतिरिक्त लॉयल्टी बोनस आहे. लॉयल्टी बोनस अतिरिक्त एक्सचेंज बोनस म्हणूनच लागू आहे. याचा लाभ कंपनीच्या एनआयसी (NIC) डीलरशिप्सकडून वाहन खरेदी केल्यास मिळणार आहे. कंपनीने आपल्या मॅग्नाइट (Magnite) या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर कोणतीही सूट किंवा सवलती दिलेल्या नाहीत.
भारतात निस्सान किक्स एसयूव्हीची आठ वेगवेगळी व्हेरिअंटस आणि एक्सएल XL, एक्सव्ही XV, एक्सव्ही प्रीमियम XV Premium आणि एक्सव्ही प्रीमियम (ओ) XV Premium (O) या चार ट्रिम लेव्हल्स उपलब्ध आहेत. ही पेट्रोल इंजिन (Petrol Engine) एसयूव्ही असून यात पेट्रोल इंजिनचे दोन प्रकार उपलब्ध आहेत. एक 1.3 लिटरचं एल टर्बो-पेट्रोल इंजिनअसून, ते 154 एचपी आणि 254 एनएम पीक टॉर्क देते, तर दुसरं 1.5 लिटरचं पेट्रोल इंजिन असून, ते 105 एचपी आणि 142 एनएम पीक टॉर्क देते. 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ऑटोमेटिक असे ट्रान्स्मिशन पर्याय यात उपलब्ध आहेत. ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस इत्यादी कार्सशी स्पर्धा करणाऱ्या या एसयूव्हीची किंमत (एक्स शोरूम) 9.49 लाख रुपयांपासून ते 14.64 लाख रुपयांपर्यंत आहे.
दरम्यान, अन्य वाहन उत्पादक कंपन्यांप्रमाणे निस्साननंही येत्या 1 एप्रिलपासून आपल्या सर्व कार्सच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Discount offer, Holi 2021, Money, Sale offers, Tech news