नवी दिल्ली, 13 मे : सध्या इंटरनेटच्या या जगात डिजीटल झाल्याचे अनेक फायदे आहेत. तसंच दुसरीकडे याचे तोटेही आहेत. अनेकदा डिजीटल व्यवहार काळजीपूर्वक न केल्यास ऑनलाइन फ्रॉड (Online Fraud) होण्याचा धोका असतो. सायबर क्राइमच्या (Cyber Crime) अनेक घटना समोर आल्या आहेत. डिजीटल ट्रान्झेक्शनमध्ये वाढ होत असताना बँकिंग-फायनेंशियल फ्रॉडच्या घटनाही वाढल्या आहेत.
अनेक लोक फ्रॉडस्टर्सच्या जाळ्यात अडकतात. ऑनलाइन फ्रॉडच्या जाळ्यात कोणी अडकल्यास काही गोष्टी फॉलो करुन तुम्ही पैसे परत मिळवू शकता. ऑनलाइन फ्रॉड झाल्यास लगेच त्यावर त्वरित अॅक्शन घेणं गरजेचं आहे. जितकी लवकर यावर अॅक्शन घेतली जाईल, तितके लवकर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे परत येण्याची शक्यता अधिक असते. अनेकदा लोक घाबरतात, अशा परिस्थितीत काय करायचं समजत नाही आणि यात वेळ गेल्यानंतर पैसे मिळण्याची शक्यता कमी होते.
ऑनलाइन फ्रॉड झाल्याचं लक्षात आल्यानंतर लगेचच तुमच्या बँकेकडे याबाबत माहिती द्या. जर तुमच्या अकाउंटमधून पैसे कट झाले असतील, तर याबाबत तीन दिवसांच्या आत तक्रार दाखल करावी लागेल. याची तक्रार तुम्ही https://www.cybercrime.gov.in/ वर किंवा लोकल पोलीस स्टेशनमध्ये करू शकता.
जर वेळीच सायबर फ्रॉडबाबत अॅक्शन घेतली, तर तुमचा नुकसानापासून बचाव होऊ शकतो. जर तुम्ही OTP शेअर केला नसेल, तर 10 दिवसांच्या आत तुम्हाला रिफंड येईल. ऑनलाइन फ्रॉड झाल्यानंतर याची लेखी सूचना बँकेकडे द्यावी लागेल आणि याची एक कॉपी तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे.
ऑनलाइन फ्रॉड होऊच नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. कधीही-कोणालाही तुमची पर्सनल माहिती देऊ नका. बँकिंग डिटेल्स, तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी इतरांशी शेअर करू नका. कोणी बँकेचा अधिकारी, टेलिकॉम कंपनीचा अधिकारी किंवा आधार-पॅन केंद्रातून किंवा एखाद्या संस्थेतून बोलत असल्याचं सांगून तुमचे कार्ड डिटेल्स, बँक, आधार-पॅन कार्डची माहिती मागितल्यास देऊ नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Online fraud