मुंबई, 01 जानेवारी : रिलायन्स जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्हीआय अर्थात व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) या देशातल्या प्रमुख टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) ग्राहकांसाठी सातत्याने नवनवीन रिचार्ज प्लॅन्स (Recharge Plans) आणत असतात. या प्लॅन्समध्ये इंटरनेट (Internet) आणि कॉलिंग (Calling) या दोन गोष्टींचा समावेश असतो. ग्राहक गरजेनुसार प्लॅन्सची निवड करत असतात. परंतु या कंपन्यांचे काही प्लॅन्स असे आहेत, की त्या प्लॅन्सनुसार वर्षातून एकदा रिचार्ज केलं की वर्षभरात पुन्हा रिचार्ज करण्याची गरज भासत नाही. सातत्यानं रिचार्ज करून वैतागला असाल, तर हे प्लॅन्स तुम्हाला निश्चितच फायदेशीर ठरू शकतात. जिओ, एअरटेल आणि व्हीआयच्या अशा वैशिष्ट्यपूर्ण प्लॅन्सची माहिती.
वर्षाच्या सुरुवातीला रिचार्ज केल्यानंतर वर्षभरात पुन्हा रिचार्ज करायची गरज पडू नये, यासाठी जिओ, एअरटेल आणि व्हीआयने काही प्लॅन्स लॉंच केले आहेत. हे प्लॅन घेऊन पैसेदेखील वाचवू शकता. तसंच वर्षभरात वारंवार रिचार्ज करण्याची गरज भासत नाही. वर्षभराचा विचार करता, सर्वसाधारणपणे प्रति महिना रिचार्ज व्हॅलिडिटी (Recharge Validity) 28, 56 किंवा 56 दिवसांची असते. 28 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला प्लॅन (Plan) घेतला असता वर्षभरात 13 वेळा रिचार्ज करावं लागतं. त्यातून 364 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. 56 किंवा 84 दिवसांच्या प्लॅनमध्येदेखील 28 दिवसांच्या प्लॅनसाठी जास्त रकमेचं रिचार्ज करावं लागतं. याचा विचार करता वर्षभरात रिचार्जवर प्रमाणापेक्षा अधिक पैसे खर्च होतात.
व्होडाफोन आयडिया
व्हीआय (Vi) अर्थात व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपनीचे देशभरात 27 कोटी युझर्स आहेत. जिओ आणि एअरटेलनंतर ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी कंपनी आहे. व्हीआय ग्राहकांना 365 दिवसांची व्हॅलिडिटी असलेले तीन प्लॅन्स ऑफर करते. यात 1799, 2899 आणि 3099 रुपयांच्या डेटा प्लॅनचा (Data Plan) समावेश आहे. या प्लॅन्समध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस फ्री मिळतात. तसंच 3099 च्या प्लॅनवर डिस्ने हॉटस्टारचं (Disney Hotstar) सब्सक्रिप्शन दिलं जातं.
व्हीआयच्या एखाद्या ग्राहकानं 28 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला 2GB चा डेटा प्लॅन घेतला तर त्यास वर्षभरात एकूण 13 वेळा रिचार्ज करावं लागतं. हा प्लॅन 179 रुपयांचा आहे. 13 रिचार्जचा हिशोब बघता ग्राहकास 2327 रुपये खर्च करावे लागतात. वर्षभरासाठीचा प्लॅन घेतला तर ग्राहकाला केवळ 1799 रुपये खर्च येतो. म्हणजेच 528 रुपयांची बचत होते.
हे वाचा - 2022 मध्ये Royal Enfieldच्या या नव्या नव्या बाईक्स होणार लाँच
ग्राहकानं 28 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला 1.5 GBचा डेटा प्लॅन घेतला तर त्याला वर्षभरात 13 रिचार्ज करावे लागतात. या प्लॅनची किंमत 299 रुपये आहे. 13 रिचार्जचा विचार करता ग्राहकाला वर्षभरात 3887 रुपये खर्च करावे लागतात. परंतु, वर्षभरासाठी जो प्लॅन आहे त्याची किंमत केवळ 2899 रुपये आहे. यामुळे ग्राहकाची 988 रुपयांची बचत होते.
जर ग्राहकानं व्हीआयचा डेली 1.5 GB चा प्लॅन घेतला तर त्याची व्हॅलिडिटी 56 दिवस असते. या प्लॅनसोबत डिस्ने हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन मोफत मिळतं; मात्र यावर ग्राहकाला वर्षभरात 6 रिचार्ज अधिक 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीचं एक रिचार्ज करावं लागतं. 56 दिवस व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनची किंमत 479 रुपये आहे. याचाच अर्थ 6 रिचार्जचा खर्च 2874 रुपये, तसंच 299 रुपयांचं एक्स्ट्रा रिचार्ज करावं लागतं. याचा एकूण खर्च 3173 रुपये होतो; मात्र वर्षभरासाठीच्या प्लॅनसाठी 3099 रुपये खर्च करावे लागतात आणि त्यामुळे 74 रुपयांची बचत होते.
एअरटेल
भारती एअरटेल ही देशातली दुसरी सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशभरात या कंपनीचे 35 कोटी ग्राहक आहेत. कंपनीने ग्राहकांसाठी 365 दिवस व्हॅलिडिटी असलेले 3 प्लॅन्स उपलब्ध करून दिले आहेत. यात 1799, 2999 आणि 3359 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. या प्लॅन्सवर कंपनीकडून वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. या सर्व प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेली 100 एसएमएस फ्री मिळतात. तसंच 3359 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकाला डिस्ने हॉटस्टारचं सब्सक्रिप्शनही दिलं जातं.
एखाद्या ग्राहकानं एअरटेलचा 28 दिवस व्हॅलिडिटी असलेला डेली 2GB चा प्लॅन घेतला तर त्याला वर्षभरात 13 वेळा रिचार्ज करावं लागतं. या प्लॅनची किंमत 179 रुपये आहे. 13 रिचार्जेसचा विचार करता ग्राहकाला 2327 रुपये खर्च करावे लागतात; मात्र एक वर्ष व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनची किमत 1799 रुपये आहे. हा प्लॅन घेतल्यास 528 रुपयांची बचत होते.
ग्राहकानं डेली 2GB डेटा आणि 28 दिवस व्हॅलिडिटी असलेला प्लॅन निवडला तर त्याला वर्षभरात 13 वेळा रिचार्ज करावं लागतं. या प्लॅनची किंमत 359 रुपये आहे. याचाच अर्थ 13 रिचार्जसाठी ग्राहकाला 4667 रुपये मोजावे लागतात. परंतु, वर्षभर व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनची किंमत 2999 रुपये आहे. हा प्लॅन घेतल्यास ग्राहकाला 1668 रुपयांची बचत करणं शक्य होतं.
जिओ
जिओचा विचार करता, देशभरात या कंपनीचे 44 कोटी ग्राहक आहेत. ही कंपनी ग्राहकांना त्यांची गरज आणि बजेटनुसार रिचार्जचे पर्याय उपलब्ध करून देते. जिओकडे 14 दिवस ते 365 दिवस व्हॅलिडिटी असलेले प्लॅन्स उपलब्ध आहेत. या प्रत्येक प्लॅन्सवर वेगवेगळ्या प्रमाणात डेटा मिळतो. जिओकडे वर्षभराची व्हॅलिडिटी असलेले 4 प्लॅन्स उपलब्ध आहेत. त्यात 2545, 2879,3119 आणि 4199 रुपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे. या सर्व प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग (Unlimited Calling), डेली 100 एसएमएस फ्री (Free SMS) मिळतात. तसंच 3119 रुपयांच्या प्लॅनमध्ये डिस्ने हॉटस्टारचं सब्सक्रिप्शनदेखील मिळतं.
एखाद्या ग्राहकानं 28 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला डेली 1.5 GBचा डेटा प्लॅन घेतला तर त्याला वर्षभरात 13 रिचार्ज करावे लागतात. या प्लॅनची किंमत 239 रुपये आहे. 13 रिचार्जचा विचार करता ग्राहकाला यासाठी 3107 रुपये खर्च करावे लागतात. मात्र वर्षभराची व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनची किंमत 2545 रुपये आहे. हा प्लॅन घेतल्यास 562 रुपयांची बचत होऊ शकते.
हे वाचा - Google अकाउंटशी लिंक आहे नको असलेले apps? 'या' पद्धतीने करा डिलीट!
जर एखाद्या ग्राहकानं 28 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला डेली 2GB चा डेटा प्लॅन घेतला, तर त्याला वर्षभरात 13 रिचार्जसाठी 3887 रुपये खर्च करावे लागतात. कारण या प्लॅनची किंमत 299 रुपये आहे. वर्षभराची व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनची किंमत 2879 रुपये आहे. हा प्लॅन घेतल्यास 1008 रुपयांची बचत होते.
ग्राहकानं 28 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला डेली 3GB चा प्लॅन घेतला तर त्याला वर्षभरात 13 वेळा रिचार्ज करावं लागतं. या प्लॅनची किंमत 419 रुपये आहे. 13 रिचार्जचा विचार करता ग्राहकाला यासाठी 5447 रुपये खर्च करावे लागतात. परंतु, वर्षभराची व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनची किंमत 4199 रुपये आहे. हा प्लॅन घेऊन ग्राहक 1248 रुपयांची बचत करू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Recharge, Technology, Telecom companies, Telecom service