मुंबई, 15 जुलै: फेसबुक (Facebook) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी असलेल्या मेटाने (Meta) त्यांच्या डेटा गोपनीयतेच्या नियमांमध्ये (Data Privacy Rules) बदल केला आहे. युझर्सना अधिकाधिक स्वातंत्र्य आणि सुरक्षित वातावरण देण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून नियम बदलल्याचं कंपनीकडून शुक्रवारी (15 जुलै) सांगण्यात आलं. मेटा कंपनीच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, डेटा गोपनीयतेच्या नियमांमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. काही नियमांमध्ये मात्र काहीच बदल केलेले नाहीत. युझर्सच्या डेटा चोरीवरून फेसबुकवर अनेकदा आरोप करण्यात आले. त्यामुळे कंपनीकडून पावलं उचलण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. ‘गोपनीयतेच्या बाबतीत युझर्सना अधिक सुरक्षित वाटावं म्हणून आमचे प्रयत्न आहेत. त्याचमुळे मेटा कंपनीने गोपनीयतेच्या धोरणात (Privacy Policy) बदल केला आहे. तुमच्याबद्दलच्या (युझर्स) माहितीचा वापर कसा केला जाणार आहे, याचं सर्व विवरण तुम्हाला मिळेल,’ असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे. हे चार मोठे बदल केले गेले
- युझर्सना धोरण लवकर समजावं म्हणून ते अगदी सोपं आणि स्पष्ट केल्याचं मेटा कंपनीने म्हटलं आहे. युझर्सची इच्छा आणि अनुभव जाणून घेण्यासाठी त्यांना एक लिंकही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- मेटा कंपनी कशा प्रकारे माहिती एकत्र जमवत आहे, याची सखोल माहिती कंपनीच्या वतीने युझर्सना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- ज्यांच्याकडून कंपनी माहिती घेते वा ज्यांना पुरवते त्या सर्व भागधारकांची (Partners) माहिती मेटा कंपनीच्या वतीने युझर्सना दिली जाणार आहे.
- एखादी कंपनी किंवा उत्पादनासाठी युझर्सची माहिती का आणि कशी शेअर केली जात आहे, याची माहितीही कंपनीकडून युझर्सना दिली जाणार आहे.
हेही वाचा - Income Tax Return for AY2022-23: टॅक्सचा पैसा वाचवायचा आहे का? तर लगेच करा ‘हे’ काम या नियमांमध्ये काहीही बदल झाला नाही युझर्सची माहिती आजवर कधीही विकली नाही आणि भविष्यातही विकणार नाही, असं कंपनीने म्हटलं आहे. यासंबंधीच्या नियमांमध्ये काहीही बदल करण्यात आलेले नाहीत. यात प्रामुख्याने कंपनी त्यांच्या युझर्सना सर्व प्रकारच्या उत्पादनांची माहिती देणार आहे. तसंच युझर्सची माहिती कशा प्रकारे एकत्र करून वापरली गेली व शेअर केली गेली याची माहिती त्यांना दिली जाणार आहे. कुठलंही नवीन फीचर लागू करण्याच्या आधी त्या धोरणाबद्दलची माहिती युझर्सना देण्यात येईल. सेटिंगचा वापर करून युझर्स त्यांची गोपनीयता अबाधित ठेवू शकतात. 26 जुलै रोजी लागू होणार नवं धोरण मेटा कंपनीचं नवीन धोरण 26 जुलै 2022 रोजी लागू होणार असल्याचं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं. यासाठी युझर्सकडूनही सल्ला विचारण्यात आला आहे. नवे बदल युझर्सनी स्वीकारले असतील तर महिन्याच्या शेवटी यावर काम सुरू होईल. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि मेसेंजरवरच्या युझर्सना मिळणाऱ्या सर्व माहितीवर गोपनीयतेचे नवीन नियम लागू करण्यात येणार असल्याचं मेटा कंपनीने म्हटलं आहे. व्हॉट्सअॅपचं स्वत:चं वेगळं गोपनीयतेचं धोरण असल्याने व्हॉट्सअॅपचा यात समावेश करण्यात आलेला नाही.