नवी दिल्ली, 22 जून: अयोध्या रामजन्म भूमी ट्रस्टच्या नावाने लाखो राम भक्तांकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. अयोध्या रामजन्म भूमी ट्रस्टच्या नावाने बनावट-फेक वेबसाईट बनवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत नोएडा सायबर क्राईम पोलिसांच्या पथकाने पाच जणांना अटक केली आहे. आरोपींकडून पाच मोबाईल, एक लॅपटॉप, दोन सिम, 50 आधार कार्ड, दोन थंब इंप्रेशन मशीन जप्त करण्यात आल्या आहेत. हे सर्व आरोपी सध्या दिल्लीत राहत होते. तसंच सर्व जण इंजिनियरिंग आणि मॅनेजमेंटचे विद्यार्थी असल्याचीही माहिती आहे. या आरोपींनी राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावाने एक वेबसाईट सुरू केली होती. हे सर्व काम बेकायदेशीररित्या सुरू होतं. ज्यांना रामजन्म भूमीसाठी दान करायचं आहे, त्यांच्यासाठी एक बँक अकाउंट नंबर देण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य अनिल कुमार मिश्रा यांनी जानेवारीमध्ये अयोध्यातील रामजन्म भूमी ठाण्यात रिपोर्ट दाखल केला होता, की ट्रस्टच्या वेबसाईटवर लोक मंदिराच्या निर्माणासाठी देणगी जमा करत आहेत. ज्यावेळी काही राम भक्तांनी त्यांनी जमा केलेल्या देणगीबाबत विचारपूस केली त्यावेळी त्यांनी दिलेले पैसे ट्रस्टच्या खात्यात पोहोचलेच नसल्याचं समोर आलं. तपासात असं आढळलं, की फेक वेबसाईट बनवून इंटरनेटवर लोकांना त्या फेक वेबसाईटवरील बँक खात्यात देणगी जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या खात्याचा तपास करण्यात आल्यानंतर फेक वेबसाईटवर हे खातं उघडण्यात आल्याचं समोर आलं. याच खात्यात अनेक राम भक्तांनी त्यांचे पैसे मंदिरासाठी जमा केले होते.
(वाचा - फेसबुकवर मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक, प्रकार ऐकून व्हाल हैराण )
तक्रारीनंतर या प्रकरणाची माहिती नोएडातील सायबर क्राईम पोलिसांना देण्यात आली. तपासात नोएडामध्ये फेक वेबसाईट चालवली जात असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडे सहा बँक खात्याचे डिटेल्स मिळाले आहेत. दोन खात्यातून अडीच लाख रुपये मिळाले आहेत. पोलिसांनी बँक खात्यात झालेली लाखोंची रक्कम फ्रीज केली आहे. या टोळीचा प्रमुख सुत्रधार आशिष गुप्ता असून तो सॉफ्टवेअर बनवतो.