नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) वाहनांच्या रजिस्ट्रेशन ट्रान्सफरची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 मध्ये (Central Motor Vehicle Rules, 1989) सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावांतर्गत वाहन नोंदणीच्या वेळी (RC) नॉमिनीचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावांतर्गत बँक खात्याच्या धर्तीवर नॉमिनीला कोणत्याही समस्येशिवाय, वाहनधारकांच्या मालकी हक्क्यांचं हस्तांतरण करता येईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार नंतर ऑनलाईन माध्यमातूनही नॉमिनीचं नाव जोडू शकेल.
असा मिळेल सुविधेचा लाभ -
वाहन मालकाचा मृत्यू झाल्यास, वाहन मालकाच्या कुटुंबियांना या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मसुद्याच्या नियमांनुसार, वाहन मालकाला वेरिफिकेशनसाठी नॉमिनीचे काही ओळख प्रमाणपत्र सादर करावे लागतात. यासाठी नॉमिनीला नवीन प्रमाणपत्रांच्या नोंदणीसाठी, आपल्या निवासस्थान किंवा राज्यातील नोंदणी प्राधिकरणाची माहिती पोर्टलच्या माध्यमातून द्यावी लागेल. पोर्टलवर वाहन मालकाचं मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करावं लागेल.
ola ड्रायव्हर्सकडून अशी होतेय फसवणूक; ग्राहकांकडून घेतलं जातंय डबल भाडं
कुटुंबियांना या समस्येचा सामना करावा लागतो -
सध्याच्या कायदेशीर प्रक्रियेनुसार, वाहनाची मालकी 90 दिवसांच्या आत हस्तांतरित करावी लागते. या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास, दर महिन्याला 500 रुपये दंडाची तरतूद आहे. हा दंड वेळेत न भरल्यास, रक्कम 1000 रुपयांपर्यंत पोहोचते. या संपूर्ण प्रक्रियेत, वाहनांच्या हस्तांतरणामध्ये अनेक समस्या येतात.
जुन्या वाहनांचं रजिस्ट्रेशही होणार सोपं -
मंत्रालयाने, 50 वर्षांहून अधिक जुन्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची नोंदणी सुलभ करण्यासाठी 'व्हिंटेज वाहन' रुपात नोंदणी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. अशा वाहनांचे मालक 10 वर्षांसाठी 20000 रुपये देऊन वाहनांची नोंदणी करू शकतात आणि त्यासाठी रिन्यू फी 5000 रुपये असेल.