मुंबई, 24 डिसेंबर : जगभरात सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. या प्लॅटफॉर्मद्वारे कोट्यवधी नागरिक एकमेकांशी जोडले गेले आहेत. यात इन्स्टाग्राम (Instagram) सर्वाधिक लोकप्रिय आहे. बॉलिवूड सेलेब्रिटींपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वजण याचा वापर करतात. आपल्या जीवनातल्या प्रत्येक बाबीचा अपडेटदेखील त्यावर दिला जात असतो. युझर्सच्या सुरक्षिततेसाठी इन्स्टाग्रामकडून वेळोवेळी व्हर्जन अपडेट केलं जातं आणि विविध फीचर्स लाँच केली जातात. इन्स्टाग्राममध्ये काही जुनी फीचरही अद्याप आहेत. त्यापैकी एक फीचर व्हिडिओ कॉलचं आहे. यामुळे अनेकांना अनोळखी खात्यावरून आलेल्या व्हिडिओ (Instagram video call) कॉलचा त्रास सहन करावा लागतो.
इन्स्टाग्रामवर 2018 पासून व्हिडिओ कॉलची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे युझर्स वैयक्तिक किंवा ग्रुप व्हिडिओ कॉल करू शकतात. हे संवाद साधण्यासाठी खूपच सोयीस्कर ठरतं. जी व्यक्ती तुम्हाला फॉलो करते, ती तुम्हाला व्हिडिओ कॉल करू शकते; पण काही अनोळखी व्यक्ती थेट व्हिडिओ कॉल करून त्रास देतात. यासंदर्भात अनेक महिलांनी तक्रारी केल्या आहेत. अनेकांनी टि्वट करून याबद्दल सांगितलं. तसंच अनेकदा इन्स्टाग्राम चॅट विंडोमध्ये व्हिडिओ कॉल असलेल्या ऑप्शनवर क्लिक झाल्यानेदेखील चुकून (video call button) व्हिडिओ कॉल लागतो. त्यामुळे अनोळखी खात्यावरून येणारे व्हिडिओ कॉल बंद कसे करायचे, याबद्दल आम्ही माहिती देत आहोत.
व्हिडिओ कॉल बंद कसे करावेत?
इन्स्टाग्रामवर इनकमिंग व्हिडिओ कॉलिंग बंद करणं खूप सोपं आहे.
इन्स्टाग्रामवरच्या तुमच्या प्रोफाइलवर जा.
वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन ओळींच्या चिन्हावर क्लिक करा.
सेटिंग्जवर क्लिक करा.
यानंतर नोटिफिकेशन पर्याय निवडा.
स्क्रीनवरच्या कॉल या पर्यायावर क्लिक करा.
From people I follow यावर क्लिक करा.
या व्यतिरिक्त तुम्ही 'ऑफ' हा पर्यायही निवडू शकता. तसं केलं तर तुम्हाला कोणीच व्हिडिओ कॉल करू शकणार नाही. याचप्रकारे तुम्ही मेसेज रिक्वेस्ट (Message Requests), मेसेजेस (Messages), Group Requests आणि Rooms यांबाबतही असंच करू शकता.
हेही वाचा : तुमचे कॉल्स सुरक्षित करण्यासाठी व्हॉट्सॲप आणणार नवं फीचर
याशिवाय, तुम्हाला तुमचं इन्स्टाग्राम अकाउंट काही काळासाठी बंद करायचं असेल, तर ही प्रक्रियादेखील अगदी सोपी आहे. यासाठी सर्वप्रथम इन्स्टाग्राम प्रोफाइलवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला स्क्रीनवर Disable My Account चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्याचं कारण विचारण्यात येईल. ते भरा आणि पासवर्ड टाका. आता Temporary Disable Account वर क्लिक करा. त्यानंतर तुमचं खातं तात्पुरतं बंद होईल.
गेल्या काही दिवसांपासून व्हिडिओ कॉलद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. दररोज फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळेच सतर्क राहणं गरजेचं आहे. वरील पद्धतीचा वापर करून इनकमिंग व्हिडिओ कॉलिंग बंद करू शकता. याबाबत नेहमी सावध राहावं. तसंच फसवणूक झाल्यास तक्रार दाखल करण्यासही संकोच करू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, Social media, Tech news