Home /News /technology /

डेटा चोरीची भीती? Account डिलीट न करताही तुम्ही सेफ ठेवू शकता Facebook वरची पर्सनल माहिती

डेटा चोरीची भीती? Account डिलीट न करताही तुम्ही सेफ ठेवू शकता Facebook वरची पर्सनल माहिती

आजच्या घडीला, फेसबुकवर तुम्ही काय काय करता याचा माग घेणारी अॅप्स (Apps) आणि सर्व्हिसेस तसंच फेसबुकच्या बाहेर तुम्ही इंटरनेटवर काय काय करता (Activities on Internet) याची माहिती तुम्हाला उपलब्ध करून देण्याची सोय फेसबुकने केली आहे.

नवी दिल्ली 02 एप्रिल : फेसबुकवर (Facebook) आपल्या वैयक्तिक माहितीचा मोठा खजिना असतो. तुम्ही हे वाचत असाल, तर तुमचं पूर्वी कधी तरी फेसबुकवर अकाउंट होतं, असेल किंवा तुम्ही सध्याही फेसबुक वापरत असाल. बालपणाच्या आठवणी शेअर करण्यापासून विविध सेवा आणि अॅप्समध्ये सुलभपणे साइन इन करण्यासाठी फेसबुकचा वापर केला जातो. केम्ब्रिज अॅनालिटिका (Cambridge Analytica) प्रकरण घडेपर्यंत फेसबुक हा आपल्याला अगदी निरुपद्रवी आणि शिस्तबद्ध प्रकार वाटत होता. जगभरातल्या युझर्सची खासगी माहिती एकत्र करण्याचा हा प्रकार केम्ब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर उजेडात आला. त्यानंतर अनेक सुनावण्या झाल्या आणि कंपनी काय काय करू शकते, याचा आढावा त्यात घेण्यात आला. हा सगळा वाद असला, तरी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर फेसबुककडे तुमची वैयक्तिक काय काय माहिती (Personal Data) आहे, हे तपासणं. गेल्या दोन वर्षांपासून सगळीकडे आरडाओरडा झाल्यानंतर फेसबुक युझर्सचा डेटा कशाप्रकारे वापरतं, हे दर्शवण्यात पारदर्शकता (Transparency) ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या घडीला, फेसबुकवर तुम्ही काय काय करता याचा माग घेणारी अॅप्स (Apps) आणि सर्व्हिसेस तसंच फेसबुकच्या बाहेर तुम्ही इंटरनेटवर काय काय करता (Activities on Internet) याची माहिती तुम्हाला उपलब्ध करून देण्याची सोय फेसबुकने केली आहे. तुमच्या फेसबुकवरील वैयक्तिक माहितीचा माग घेणं, शोधणं आणि ती नष्ट करणं यासाठी आम्ही इथे मार्गदर्शन करत आहोत. फेसबुककडे असलेली तुमची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही फेसबुकला रिक्वेस्ट करू शकता, तसंच फेसबुकबाहेर तुम्ही जे काही करता, त्याची फेसबुकमध्ये झालेल्या नोंदीची माहितीही पाहू शकता. डेटा प्रायव्हसी आणि सायबर सिक्युरिटी हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्या अनुषंगाने फेसबुकवर नोंद झालेल्या तुमच्या खासगी माहितीचा माग घेण्यासाठीचं हे मार्गदर्शन तुमच्या प्रायव्हेट डेटासाठी (Private Data) फेसबुक कसं चेक करायचं? तुमचा डेटा पाहण्यासाठी फेसबुक सध्या सेटिंग्ज मेनूमधूनच ऑप्शन देतं. त्यासाठीचे टप्पे - 1. (डेस्कटॉपवरून) तुमच्या फेसबुक अकाउंटला लॉगिन करा. वरच्या उजव्या कोपऱ्यातल्या ड्रॉप डाउन अॅरोवर क्लिक करा. त्यानंतर ‘Settings & privacy’ यावर क्लिक करा. 2. तुमच्या फेसबुक अकाउंटवरच्या प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये काही बदल तुम्हाला करायचे असतील, तर ‘Privacy checkup’ हा पर्याय निवडा. 3. तुमचा डेटा ट्रॅक करण्यासाठी Settings वर क्लिक करा. त्या टॅबमध्ये ‘Your Facebook information’ असं लिहिलेल्या सेक्शनवर क्लिक करा. 4. तुमची सगळी माहिती मिळवण्यासाठी या सेक्शनमध्ये ‘Access your information’ यावर क्लिक करा. इथून पुढे जे पेज ओपन होईल, ते अनेकांना गोंधळात टाकणारं असेल, याची नोंद घ्या. तुमची फेसबुक अॅक्टिव्हिटी पाहण्यासाठी... 1. तुमचा फेसबुकवर असलेला सगळा डेटा तपासणं हा पहिला टप्पा झाला. त्यात तुम्ही तुमच्या सगळ्या पोस्ट्स, टॅग्ड फोटोज, पोल्स आणि अन्य गोष्टी पाहू शकता. 2. इथून एखादी पोस्ट तुम्हाला रिमूव्ह करायची असेल, तर ती रिसायकल बिनमध्ये टाका. तिथून delete forever करून ती पोस्ट फेसबुकवरून कायमची काढून टाकता येते. 3. तुम्ही तुमची फेसबुकसोबत शेअर केलेली प्रायव्हेट इन्फॉर्मेशन याच पद्धतीने कायमची डिलीट करू शकता. त्यात सर्च हिस्ट्री वगैरेचाही समावेश होतो. फेसबुक फोटोज आणि व्हिडिओ काढून टाकणं 1. तुम्हाला फेसबुकवरचे फोटोज आणि व्हिडिओजची कॉपी हवी आहे, पण ते फेसबुकवर ठेवायचे नाहीयेत, तर तुम्ही ‘Transfer a copy of your photos and videos’ या टॅबचा वापर करू शकता. 2. इथे तुम्ही फोटोज किंवा व्हिडिओ निवडू शकता. त्यात तुम्ही एखादा विशिष्ट अल्बम निवडू शकता किंवा डेट रेंजही निवडू शकता. 3. तुमचे फोटोज किंवा व्हिडिओजचा बॅकअप घेण्यासाठी तुम्हाला चार पर्यायांतून एक पर्याय निवडता येतो. त्यात ड्रॉपबॉक्स आणि गुगल फोटोज हे लोकप्रिय पर्याय आहेत. फेसबुककडे तुमच्याबद्दल असलेला सगळा डेटा डाउनलोड करणं 1. download a full copy हा पर्याय वापरून तुम्ही फेसबुककडे तुमच्याबद्दल असलेली सगळी माहिती डाउनलोड करू शकता. त्यात पेमेंट इन्फॉर्मेशन, तुमचा फेसबुक डेटा वापरणारी अॅप्स आणि वेबसाइट्स, फेसबुकवरच्या अॅड्स आणि बिझनेसेसमधला डेटा आणि आणखी बरंच काही. 2. तुम्हाला काय डाउनलोड करायचं आहे ते निवडायचं, डेट रेंज ठरवायची, फाइल रूपात डाउनलोड केल्या जाणार असलेल्या मीडियाची क्वालिटी हे सगळं निवडायचं. ‘Your Facebook information’ या सेक्शनमध्ये ‘Download your information’ या टॅबमधल्या Create File या पर्यायावर क्लिक करायचं. 3. साधारणपणे एक-दोन दिवसांत फाइल तयार होते आणि ती डाउनलोडिंगसाठी रेडी झाल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येतं. ती फाइल पासवर्ड प्रोटेक्टेड असते आणि 48 ते 72 तासांकरिता ती डाउनलोडसाठी उपलब्ध असते. फेसबुकबाहेरच्या ट्रॅकर्सचं व्यवस्थापन 1. Off-Facebook activity म्हणजेच फेसबुकवर लॉगिन असताना त्याच डिव्हाइसवरून आपण इंटरनेटवर केलेल्या दुसऱ्या अॅक्टिव्हिटीज. यात आपण काय काय करतो त्याची नोंद होत असते. ते पाहण्यासाठी ‘Off Facebook activity’ हा पर्याय निवडा आणि ‘Manage your off-Facebook activity’ यावर क्लिक करा. 2. फेसबुकला तुम्हाला अधिकाधिक जाहिराती दाखवणं सोपं व्हावं, म्हणून तुमच्या अॅक्टिव्हिटीजची नोंद ठेवणाऱ्या अॅप्सची माहिती इथे तुम्हाला दिसेल. 3. तुमची अॅक्टिव्हिटी ट्रॅक करणाऱ्या प्रत्येक सर्व्हिसवर क्लिक करून, तुमची माहिती किती वेळा फेसबुकला दिली गेली, हे तुम्ही पाहू शकता. 4. इथून स्क्रोल डाउन करून ‘Turn off future activity from x’ हा पर्याय निवडा. 5. तिथे गेल्यावर ‘turn off’ हा पर्याय निवडावा. हे केल्यानंतरही फेसबुकला तुमची माहिती मिळतच असते, पण ती थेट तुमच्या अकाउंटशी जोडली जात नाही, याची नोंद घ्यावी. फेसबुक अकाउंट डिलीट न करता तुमच्या फेसबुक अकाउंटवरून पर्सनल माहिती शोधून ती डिलीट कशी करू शकता, याची ही माहिती आहे. फेसबुकची इन्स्टाग्रामसारखी अॅप्स तुम्ही वापरत असाल, तर तुमची माहिती फेसबुकला मिळत राहते आणि त्या माहितीचा फेसबुककडून वापरही केला जात असतो. पण तरीही तुमची माहिती ट्रॅक करणाऱ्या अॅप्सची माहिती फेसबुकवरून दर ठरावीक दिवसांनी डिलीट करत राहणं इष्ट. त्यामुळे तुम्ही इंटरनेटवर काय काय पाहता, काय काय करता ही माहिती अॅडव्हर्टायझर्सना मिळण्यापासून प्रतिबंध होईल आणि त्याचा त्यांना होणारा व्यावसायिक लाभ बंद होऊ शकेल.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Facebook, User data

पुढील बातम्या