नवी दिल्ली, 21 जुलै : मागील दीड वर्षापासून कोरोना व्हायरसने कहर केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जीवनातल्या अनेक गोष्टींच्या व्याख्याच बदलल्या आहेत. वर्क फ्रॉम होम, स्कूल फ्रॉम होम, मीटिंग्ज फ्रॉम होम अशा गोष्टी आता आपल्या अगदी नेहमीच्या जगण्याचा भाग होऊन गेल्या आहेत. या सगळ्यासाठी अत्यावश्यक असलेली मूलभूत गोष्ट म्हणजे वेगवान इंटरनेट (Internet). इंटरनेटची ही गरज मोबाईल डेटाकडून पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे घरात वाय-फाय सुविधा उपलब्ध करून घेणं फायद्याचं, गरजेचं ठरतं. वाय-फाय सुविधेसाठीच्या (Wi-Fi Router) राउटरची रेंज काही वेळा कमी पडते किंवा एखाद्या खोलीत मिळत नाही, असं अनेकदा होत असतं. म्हणूनच वाय-फायची रेंज वाढवण्यासाठी काही टिप्स उपयुक्त ठरू शकतील.
राउटरचं फर्मवेअर अपडेट (Firmware Updation) करावं -
ज्या वाय-फाय राउटरच्या माध्यमातून आपल्याला इंटरनेट मिळतं, त्या हार्डवेअरकडे दुर्लक्ष करण्याचं प्रमाण मोठं असतं. फोन, लॅपटॉप्स किंवा अगदी टीव्ही अपडेट केले जातात, पण राउटर अपडेट करण्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं. योग्य अॅडमिन मेन्टेनन्स नसेल, तर वाय-फाय राउटर बराच काळ कालबाह्य झालेल्या फर्मवेअरवरच काम करत राहतो. त्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते, इंटरनेटचा वेग कमी होतो आणि त्याच्यावर आधारित असलेल्या नेटवर्कमधल्या उपकरणांना असलेला सायबर क्राइमचा धोकाही वाढतो. म्हणून वाय-फाय राउटरचा जास्तीत जास्त उपयोग होण्यासाठी आणि सायबर सुरक्षिततेसाठी वाय-फाय राउटरच्या सेटिंग्जमध्ये लॉगिन करावं. त्यासाठीचा IP राउटरच्या बॉक्सवर दिलेला असतो. लॉगिन केल्यानंतर लेटेस्ट वेरिएंटला तो अपडेट करावा. हे केल्यानंतर राउटर डीबग होईल आणि पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने, वेगाने काम करू लागेल.
नोकरी शोधणाऱ्यांसाठी Good News!याठिकाणी फक्त 4 तास काम करुन महिन्याला कमवा 60000
राउटरची जागा (Place of Router) -
आपण घरात राउटर कुठे ठेवतो, यावरही त्याची रेंज अवलंबून असते. वाय-फाय राउटर ठेवण्यासाठी घरातली मध्यवर्ती जागा निवडावी. तुम्ही जिथे कामाला बसणार आहात ती जागा आणि राउटर यांच्यामध्ये काँक्रीटच्या भिंतीसारखे अडथळे कमीत कमी असतील, अशी जागा राउटरसाठी निवडावी. असं केलं तर रेंज चांगल्या प्रकारे संपूर्ण घरभर मिळू शकते.
वाय-फाय चॅनेल अपडेशन (Wi-Fi Channel Updation) -
आपण वाय-फाय राउटर सेटिंग्ज डिफॉल्ट मोडलाच ठेवतो. त्यामुळे 2.4GHz आणि 5GHz या दोन्ही वाय-फाय बँड्सना एकच प्री-सिलेक्टेड वाय-फाय चॅनेल राहतं. त्यामुळे बँड्सचं कंजेशन होऊन वाय-फाय रेंजवर मर्यादा येऊ शकते आणि नेटवर्क स्पीडही कमी होतो. त्यामुळे वाय-फाय राउटरला लॉगइ करून अॅडमिन पॅनेलला जावं. 2.4GHz किंवा 5GHz यांपैकी एकच नेटवर्क बँड एका वेळी निवडावा. कोणता नेटवर्क बँड आपल्यासाठी उपयुक्त आहे हे ओळखण्यासाठी मॅक उपकरणांवर इनबिल्ट नेटवर्क स्कॅनर टूल असतं. तसंच विंडोज पीसीवर थर्ड पार्टी अॅप वापरून योग्य वाय-फाय चॅनेल निवडता येतं. असं केल्यास वाय-फायचा स्पीड आणि रेंज वाढते.
Instagram Security फीचर असं करा अॅक्टिव्हेट, तुमचं अकाउंट हॅकर्सपासून राहिल सेफ
जुन्या लॅपटॉप्ससाठी (Old Laptop) -
तुम्ही जुना लॅपटॉप वापरत असाल, तर तुमच्या लॅपटॉपची नेटवर्कला कनेक्ट होण्याची क्षमता कमी झालेली असू शकते. अशा परिस्थितीत यूएसबी वाय-फाय अॅडाप्टर हा चांगला पर्याय आहे. नेटगिअर कंपनीचा यूएसबी वाय-फाय अॅडाप्टर (USB wi-fi adapter) चांगला आहे. त्याचा वापर केल्यास तातडीने नवा लॅपटॉप घेण्याची गरज नाही.
रेंज एक्स्टेंडर (Range Extender) -
वर सांगितलेल्या सगळ्या उपायांपैकी कोणताच उपाय लागू पडला नाही, तर रेंज एक्स्टेंडरचा वापर करावा. त्यामुळे तुमच्या वाय-फाय राउटरची रेंज जास्त लांबपर्यंत जाऊ शकते. नव्या रेंज एक्स्टेंडरचा सेट-अप सोप्या पद्धतीने करता येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Internet use, Tech news