नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : मुंबईतलं किंवा कोणत्याही शहरातलं ट्रॅफिक दिवसेंदिवस मोठी समस्या होत आहे. ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर आपण अनेकदा आपल्याकडे उडणारी कार असती तर...? ट्रॅफिकमधून वाचून उडत हवं त्या ठिकाणी पोहचलो असतो असं वाटतं. आता हे वाटणं खरं ठरण्याची शक्यता आहे. भारतातही आता फ्लाईंग कारची मजा घेऊ शकते. नेदरलँड Pal-V (पर्सनल एयर लँड व्हीकल) लवकरच गुजरातमध्ये आपला प्लांट लावण्याच्या तयारीत आहे.
ही गाडी ट्रॅफिकमध्ये अडकल्यास, तिला उडण्यासाठी केवळ 30 बाय 30 फूटांची खुली जागा लागणार आहे. या कारची किंमती 3.5 ते 4 कोटी रुपये असल्याची माहिती आहे.
हे वाचा - महिंद्रा कंपनी या गाडीच्या खरेदीवर ग्राहकांना फ्री देतेय 1 लाखांचा कोरोना विमा
PTI या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, PAL-Vचे उपाध्यक्ष कार्लो मासबोमिले आणि गुजरातचे एमके दास यांच्यात एक सामंजस्य करार झाल्याचीही माहिती आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकार PAL-V प्लांट सेटअप करण्यासाठी सर्वप्रकारच्या मंजुरी मिळवण्यात मदत करत आहे. PAL-Vचे आतंरराष्ट्रीय व्यवसाय उपाध्यक्ष कार्लो मासबोमिले यांनी फ्लाईंग कारविषयी बोलताना सांगितलं की, चालणारी कार 3 मिनिटांत फ्लाईंग कारमध्ये रूपांतरित होईल, ज्यावेळी कार लँड होईल त्यावेळी एक इंजिन काम करेल आणि त्याची वेगमर्यादा 160 किमी ताशी असेल.
दरम्यान, Pal-V भारतात ऑटो किंवा एव्हिएशनशी संबंधीत कंपन्यांसह भागीदारी करू इच्छित आहे. गुजरातमध्ये जवळपास 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून आपला प्लांट लावायचा Pal-Vचा मानस आहे. ही कार भारतात कधी येईल हे सांगता येत नाही. परंतु भविष्यात भारतातील रस्त्यांवर फ्लाईंग कार पाहायला मिळतील, असं म्हणण्यास हरकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.