नवी दिल्ली, 11 जून: स्मार्टफोनप्रमाणे (Smartphone) आता जगभरात स्मार्टवॉचलाही (Smartwatch) मागणी वाढली आहे. आरोग्याबाबत संदेश देणारी स्मार्टवॉच मेसेज बघण्याचीही सुविधा देतात. मनगटावर विराजमान होणारी छोटेखानी स्मार्टवॉचेस आधुनिक फिचर्समुळे वेगानं लोकप्रिय होत आहेत. अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या स्मार्टवॉच देखील सादर करत आहेत. या यादीत आता सोशल मीडिया दिग्गज फेसबुकचीही (Facebook) भर पडणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात उडी घेऊ पाहणाऱ्या फेसबुकनं गेल्या काही वर्षांपासून स्मार्टवॉचच्या क्षेत्रात प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे. हे स्मार्टवॉच येण्यापूर्वीच त्याची जोरदार चर्चा आहे. मात्र अद्याप कंपनीनं जाहीरपणे याबाबत काहीही सांगितलेले नाही. स्मार्टफोनचे फिचर्स असणारे हे फेसबुकचे स्मार्टवॉच पुढील वर्षी मे महिन्याच्या सुमारास बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता असून याची दुसरी, तिसरी आवृत्तीही त्या पुढील वर्षात आणण्याची योजना आहे. या स्मार्टवॉचची किंमत साधारण 400 डॉलर्स म्हणजेच 29 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. दी व्हर्जनं दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुकच्या या स्मार्टवॉचमध्ये दोन कॅमेरे असतील. फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी हे कॅमेरे वेगळे केले जाऊ शकतात. या स्मार्टवॉचमध्ये पुढील बाजूस एक आणि मागील बाजूस एक कॅमेरा असेल. फ्रंट कॅमेरा प्रामुख्यानं व्हिडिओ कॉलसाठी तर मागच्या बाजूस असलेला 1080 पी ऑटो फोकस कॅमेरा व्हिडिओ फुटेज कॅप्चर करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. अॅसेसरीज बनवण्यासाठी फेसबुकनं इतर कंपन्यांशी संपर्क साधल्याचंही व्हर्जनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. स्मार्टफोन जसा वापरला जातो तशा पध्दतीनं स्मार्टवॉच वापरण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं हे फेसबुकचे उद्दिष्ट आहे. अॅपल (Apple ) आणि गुगलला (Google) टक्कर देणारी अधिक ग्राहकोपयोगी साधनं तयार करण्याची फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांची योजना आहे. हेही वाचा- शरद पवार-प्रशांत किशोर यांच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया या स्मार्टवॉचमधील एलटीई कनेक्टिव्हिटीला सपोर्ट देण्यासाठी फेसबूक अमेरिकेतल्या (USA) दिग्गज वायरलेस कंपन्यांचे सहकार्य घेत आहे. यामुळे हे स्मार्टवॉच वापरण्यासाठी ते स्मार्टफोनला जोडण्याची गरज भासणार नाही. व्हर्जच्या वृत्तानुसार, हे घड्याळ व्हाइट, ब्लॅक आणि गोल्ड अशा तीन रंगामध्ये येईल. आपल्या नियोजित एआर गॉगल्ससाठी (AR Goggles) इनपूट डिव्हाइस म्हणून हे स्मार्टवॉच काम करेल असा फेसबुकचा प्रयत्न आहे. आर्मबँड्सच्या हालचालींद्वारे संगणकावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं असं सिद्ध करणाऱ्या सीटीआरएल-लॅब (CTRL Lab) या स्टार्टअपकडून घेतलेल्या तंत्रज्ञानाचाही वापर यात करण्याचीही फेसबुकची योजना आहे. हेही वाचा- ‘’… वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा’’, संजय राऊतांचं भाजपला चॅलेन्ज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.