नवी दिल्ली, 13 मार्च: सोशल मीडियातील (Social Media) सर्वांत लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकनं (Facebook) आपल्या युजर्ससाठी भरभक्कम पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. फेसबुक युजर्सना आता एक मिनिटांचे छोटे व्हिडीओ (Short Video) तयार करून त्यातून पैसे मिळवता येणार आहेत. फेसबुक कंपनीनं गुरुवारी एका ब्लॉगच्या (Blog) माध्यमातून ही योजना जाहीर केली. या योजनेनुसार आता कंटेट क्रिकेटर्सना जाहिरातींच्या माध्यमातून (Advertisements) शॉर्ट व्हिडीओमधून कमाई करता येईल. सध्याच्या काळात तर ही एक सुवर्णसंधीच कंपनीनं उपलब्ध केली आहे. अनेक तरुण युजर्सना या योजनेचा फायदा होणार आहे. कोणत्या पद्धतीनं युजर्स फेसबुकच्या माध्यमातून पैसे कमावू शकतात याबाबतही कंपनीनं या ब्लॉगमध्ये माहिती दिली आहे.
एका मिनिटाच्या व्हिडीओसाठी पैसे मिळणार :
फेसबुक कंपनी कंटेंट क्रिएटर्ससाठी (Content Creators) पैसे कमावण्याचे पर्याय वाढवत आहे. फेसबुकवर अनेक कंटेंट क्रिएटर्स वेगवेगळ्या प्रकारचे लेखन, व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांची स्वतंत्र पेजेस असतात. त्यांना मिळणाऱ्या व्ह्यूज, लाईक्स, फॉलोअर्सच्या आधारावर त्यांना कमाईही होत असते. फेसबुक युजर्सनी एका मिनिटाचा व्हिडीओ बनवून तो शेअर केला आणि त्याला किमान 30 सेकंदाच्या जाहिराती मिळाल्या तर त्यासाठी कंपनी त्यांना पैसे देईल. तीन मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळाच्या व्हिडीओमध्ये किमान 45 सेकंदांच्या जाहिराती मिळणं आवश्यक आहेत. ज्यांच्या व्हिडीओला जास्त पसंती मिळेल, त्यांना जाहिराती अधिक असतील आणि पर्यायानं त्यांना पैसेही अधिक मिळतील.
(हे वाचा-Netflix पाहायचंय तर आत्मनिर्भर व्हा! एक अकाउंट शेअर करून वापण्यावर येणार मर्यादा)
यापूर्वी केवळ तीन मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळच्या व्हिडीओसाठी जाहिरातीद्वारे युजर्सना पैसे मिळत होते. या व्हिडीओमध्ये एका मिनिटांच्या आधी कोणतीही जाहिरात दिसत नसे. युजर्स किंवा त्यांच्या पेजवरील व्हिडिओला 60 दिवसांमध्ये 6 लाख व्ह्यूज (Views) आवश्यक आहेत. लाईव्ह व्हिडिओ (Live Video) 60 हजार मिनिटं बघितला जाणं गरजेचं आहे, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. कंपनी इन्स्टाग्रामवरील (Instagram) व्हिडीओमध्ये देखील जाहिराती दाखवते. जाहिरातीबाबतही नवे प्रयोग करण्यात येत असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.