नवी दिल्ली 26 डिसेंबर : जागतिक स्तरावर बॅटरी सेलच्या किमतीत वाढ झाल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनं (ईव्ही) बनवणाऱ्या कंपन्यांना आर्थिक दबावाचा सामना करावा लागत आहे. यामुळे येत्या काही महिन्यांत या कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतींमध्ये सुमारे पाच ते सात टक्क्यांनी वाढ करतील, अशी शक्यता आहे. इलेक्ट्रिक कार बनवणारी देशातील सर्वांत मोठी कंपनी टाटा मोटर्सनं सांगितलं की, ते जानेवारी 2023 मध्ये टियागो ईव्हीची किंमत 30 ते 35 हजार रुपयांनी वाढवणार आहेत.
देशभरात इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं, सरकारनं बॅटरी सुरक्षिततेचे कठोर नियम ठरवण्याआधी छाननी वाढवली आहे. आता दोन टप्प्यांमध्ये असलेल्या बॅटरी निकषांमुळे बॅटरी सुरक्षिततेत सुधारणा होतीलच शिवाय वाहनांच्या खरेदीची किंमतही वाढेल, अशी अपेक्षा आहे.
World's Fastest Electric Car: मुंबई ते कोल्हापूर अवघ्या एका तासात, ‘या’ इलेक्ट्रिक कारचा नादच खुळा
ईव्ही वाहनांच्या बॅटरी सुरक्षेवर सरकारचा भर
ईव्हीमध्ये वापरल्या जाणार्या बॅटरीसाठी, सरकार दोन टप्प्यांत नवीन नियम लागू करत आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात, AIS 038 नावाचं मानक 1 डिसेंबर 2022 पासून अंमलात आलं आहे. तर दुसरा टप्पा 31 मार्च 2023 पासून लागू होईल. यामुळे बॅटरीची किंमत पूर्वीच्या तुलनेत वाढेल. बॅटरींच्या किमती वाढल्यानं वाहनांच्या खरेदीवर परिणाम होण्याची भीती कंपन्यांना आहे. बॅटरीसाठी तयार केलेल्या नवीन नियमांमुळे नवीन डिझाइन्स सादर होतील. या डिझाइन्समध्ये प्रभावी थर्मल व्यवस्थापन आणि बॅटरीला अधिक संरक्षण प्रदान होईल. शिवाय चार्जरसह चांगली बॅटरी व्यवस्थापन प्रणाली मिळेल.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ईव्हीच्या मागणीत तिपटीनं वाढ
अधिकृत पोर्टलवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये ईव्ही विक्रीमध्ये तिपटीनं वाढ झाली आहे. 2021 मध्ये सुमारे तीन लाख 22 हजार गाड्यांची विक्री झाली होती. 2022 मध्ये सुमारे नऊ लाख 69 हजार ईव्ही विकल्या गेल्या आहेत. 2021 च्या तुलनेत, या वर्षी इलेक्ट्रिक कारची विक्री 167 टक्क्यांनी वाढून 31 हजार 900 युनिट्स इतकी झाली आहे. तर, 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 1.5 लाख युनिटच्या तुलनेत या वर्षी इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री चार पटीने वाढून सहा लाख युनिट झाली आहे.
फक्त Nexonच नाही, Tataच्या ‘या’ Electric Carसाठी ग्राहकांच्या रांगा, पाहा किंमत अन् फिचर्स
गेल्या काही वर्षांत जगभरात इलेक्ट्रिक कारची मागणी झपाट्याने वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं, ही या मागील कारणं आहेत. आजकाल अनेक अॅडव्हान्स, लक्झरी आणि हायटेक लक्झरी कार बाजारात आल्या आहेत. विविध प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानानं या कार सुसज्ज आहेत. असं असूनही, इलेक्ट्रिक कारच्या क्षमतेवर अजूनही प्रश्न उपस्थित होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Electric vehicles, Technology