यवतमाळ, 25 जून: कोरोना काळात डिजीटल व्यवहारात वाढ झाली असताना, दुसरीकडे सायबर फ्रॉडची (Cyber Fraud) प्रकरणंही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकदा बँकेकडून मेसेज, सोशल मीडिया साईटवर सायबर फ्रॉड, ऑनलाईन फसवणुकीबाबत सावध राहण्याचं सांगितलं जातं. फ्रॉडस्टर्स विविध मार्गांनी ग्राहकांनी फसवणूक करत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. असाच एक प्रकार यवतमाळमध्ये घडला असून, महिलेला बँकेचा कस्टमर केअर नंबर (Customer care Number) गुगलवर सर्च (Google Search) करणं चांगलंच महागात पडलं आहे.
एका महिलेने बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर गुगलवर सर्च केला. त्यानंतर त्या काही वेळातच त्या महिल्याच्या खात्यातून तब्बल दोन लाख 37 हजारांची रक्कम गायब झाली. याबाबत अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
स्टेट बँकेत खातं असणाऱ्या महिलेने बँकेच्या अॅपबद्दल माहिती मिळवण्यासाठी गुगलवर स्टेट बँकेचा कस्टमर केअर नंबर सर्च केला. 933907421 हा कस्टमर केअर नंबर असल्याचं गुगलवर समजलं. या नंबरवर संपर्क केल्यानंतर समोरच्या व्यक्तीने महिलेला काही प्रोसेस फॉलो करण्यास सांगितली आणि महिलेने सांगितल्याप्रमाणे गोष्टी केल्या.
कस्टमर केअर बोलत असल्याचं सांगत फ्रॉडस्टरने महिलेला क्विक शेअर अॅप डाउनलोड करण्यास सांगितलं. त्यानंतर बँक पासबुकचा फोटो अपलोड करायला लावला, ATM पीन मागितला आणि तुमचं काम झालं असल्याचं समोरून सांगण्यात आलं. काही वेळात त्यांच्या खात्यातून 2 लाख 37 हजारांची रक्कम कट झाली आणि त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचं समजलं. पोलिसांत याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अनेकदा गुगलवर कोणताही कस्टमर केअर नंबर सर्च न करण्याचं सांगितलं जातं. कस्टमर केअर नंबर कधीही 10 अंकी नसतो. फ्रॉडस्टर्सने आतापर्यंत अनेकांची अशाप्रकारे बनावट कस्टमर केअरवरुन फसवणूक करत अनेकांना गंडा घातला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Online fraud, Yavatmal crime