सासाराम, 13 डिसेंबर : सायबर क्राईम आरोपींनी एका रिटायर्ड अधिकाऱ्यांच्या खात्यातून तब्बल 40 लाख रुपयांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. सायबर क्राईमसंबंधीची तक्रार पोलिसांनी दाखल केली आहे. परंतु पीडित व्यक्तीला यातील एक रुपयाही परत मिळाला नसल्याने ते न्यायासाठी भटकत आहेत. न्यायासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं असून संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पीएमओकडून त्यांना प्रतिक्रियाही आली आहे.
बिहारमधील सासाराम येथे राहणारे रिटायर्ड अधिकारी प्रकाश चंद्र अखौरी नाल्कोमध्ये एचआरडी पदावर तैनात होते. सेवानिवृत्तीनंतर जमवलेले पैसे, त्यांनी आपल्या पुढील आयुष्यासाठी राखून ठेवले होते. त्यांनी आपल्या नोकरी दरम्यान पटनामध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. रिटायर्डमेंटनंतर त्यांनी तो फ्लॅट विकून, आलेले पैसे बँकेत जमा केले होते. त्या जमा केलेल्या पैशांवर त्यांना व्याज मिळत होतं. त्याच व्याजाच्या पैशांचा ते वापर करत होते.
परंतु सायबर क्राईम आरोपींनी त्यांच्या खात्यातून तब्बल 40 लाखांची चोरी केली. चोरी केलेल्या या पैशातून आरोपींनी बनारसमधील एका ज्वेलरी दुकानातून ऑनलाईन पेमेंटद्वारे सोन्याची खरेदी केली.
पोलिसांनी या प्रकरणातील चार सायबर आरोपींना अटक केली आहे. अटक झालेले आरोपी पीडित व्यक्तीच्या जवळचेच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी दोन जण त्यांचे भाडेकरू होते. पीडित रिटायर्ड अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या दोन मुली परदेशात राहतात. सासाराम येथे ते एकटेच राहतात. अशात या आरोपींची त्यांच्यावर नजर असून त्यांना असुरक्षित वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.
पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून सोनंही जप्त करण्यात आलं आहे. परंतु त्यांना अद्यापही त्यांचे पैसे परत मिळाले नाही. अखेर त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयात पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. पीएमओकडून त्यांना प्रतिक्रिया आल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान कार्यालय आणि रिझर्व्ह बँककडून आपल्याला न्याय मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे.