नवी दिल्ली, 10 एप्रिल : क्रेडिट कार्ड्स आणि ईएमआय हे प्रकार पुरेसे नव्हते म्हणून की काय, आता भारतीय ग्राहकांना खरेदीची उधारी ठेवण्याची सवय लावली जात आहे. गेल्या साधारण दोन-तीन वर्षांत अर्थविषयक अनेक संस्थांनी 'बाय नाऊ, पे लॅटर' (Buy Now Pay Later - BNPL) म्हणजेच 'आत्ता खरेदी करा,पैसे नंतर द्या' अशी सुविधा देऊ केली आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीमध्ये अनेक ग्राहकांना या योजनेअंतर्गत खरेदी करणं भाग पडलं.
ईएमआय फायनान्सिंग (EMI Financing) आणि पे लॅटर (PayLater) कंपनी असलेल्या 'झेस्टमनी'च्या (ZestMoney) माहितीनुसार, त्यांचे 68 टक्के ग्राहक टियर टू आणि टियर थ्री म्हणजेच छोट्या शहरांतले आहेत. उर्वरित 32टक्के ग्राहक टियर वन म्हणजेच महानगरांमधले आहेत.
पुण्यातल्या 27वर्षांच्या शालिनी राव यांचं असंच एक उदाहरण. कोविड-19 मुळे अनेकांप्रमाणेच त्यांनीही अत्यावश्यक वस्तू आणि औषधांसाठी ऑनलाइन खरेदीचा मार्ग पत्करला. ऑनलाइन खरेदी करताना त्यांना 'बीएनपीएल' योजनांची माहिती मिळाली. 'त्या योजनेचा मला सण-उत्सवांच्या काळात छोट्या-मोठ्या खरेदीसाठी उपयोग झाला आणि नंतर ती रक्कम ईएमआयमध्ये रूपांतरित करता आली,' असं त्यांनी सांगितलं. पण राव यांना नंतर त्याची बरीच किंमत मोजावी लागली.
'झेस्टमनी'च्या 2020 च्या अहवालानुसार, 'बीएनपीएल' योजनेत सहभागी होणाऱ्या भारतीय ग्राहकांचं सरासरी वय 34 वर्षं आहे. या वर्षभरात ऑनलाइन शिक्षण, महागडे स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, फॅशन आणि प्रवास आदी कारणांसाठी ऑनलाइन खर्च केलेल्या व्यक्तींनी 'बीएनपीएल' सुविधा वापरली.
'झेस्टमनी'चे सीईओ आणि सहसंस्थापक लिझी चॅपमन यांनी सांगितलं, 'बीएनपीएल योजना 2020 मध्ये अनेक ग्राहकांनी स्वीकारली. या वर्षी त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण ग्राहकांना त्याची सवय लागेल. संपूर्णपणे डिजिटल पद्धतीने कर्ज घेण्याचा हा अनुभव ग्राहकांना आवडतोय.'
एमस्वाइप (mSwipe) ही इंडिपेंडंट मोबाइल पॉइंट ऑफ सेल मर्चंट अॅक्वायरर आणि नेटवर्क प्रोव्हायडर कंपनी आहे. या कंपनीचे बिझनेस हेड योगेश वर्मा यांनी सांगितलं, 'मुंबई, बेंगळुरू, दिल्ली अशा महानगरांमधल्या लोकांचं बीएनपीएलमध्ये सहभागी होण्याचं प्रमाण मोठं आहे. त्यांचे व्यवहार सरासरी 43 हजार रुपयांचे असतात.'
पाइन लॅब्ज (PineLabs) ही संस्था व्यापाऱ्यांना विविध माध्यमांतून पैसे स्वीकारण्याची सुविधा देते. 'पाइन लॅब्ज'चे चीफ बिझनेस ऑफिसर कुश मेहरा म्हणाले, 'वाढलेली मागणी आणि उत्पन्नात अनिश्चितता यांच्या संयुक्त परिणामाने ग्राहकांना कर्जाच्या पर्यायाकडे वळवलं.'
'बीएनपीएल'ची कार्यपद्धती -
बाय नाऊ पे लॅटर (BNPL) या योजनेअंतर्गत तुम्ही आत्ता एखादी वस्तू/सेवा खरेदी करू शकता आणि त्याचे पैसे नंतर देऊ शकता.
एखाद्या फिनटेक कंपनीकडे (Fintech Firm) तुम्ही नोंदणी केलीत, की ती तुम्हाला त्या कंपनीच्या भागीदार असलेल्या कोणाही व्यापाऱ्यांकडे ऑनलाइन स्टोअर्स मधून ठरावीक मुदतीत (उदा.15 ते 30 दिवस) खरेदी करण्याची सुविधा देते. त्याचं पेमेंट सायकल ठरवलेलं असतं. त्या पेमेंट सायकलच्या अखेरीला तुम्हाला सर्व बिलाचं शुल्क भरावं लागतं.
पेमेंट सायकलमध्ये (Payment Cycle) तुम्ही शुल्क भरू शकला नाहीत, तर त्यावर व्याज आकारलं जातं. ते तुमच्या बिलाच्या रकमेवर अवलंबून असतं. काही बीएनपीएल कंपन्या मोठ्या रकमेच्या खरेदीवर तीन ते सहा महिन्यांसाठी बिनव्याजी कर्ज देऊ करतात.
अॅमेझॉन पे (Amazon Pay), ई-पे-लॅटर (ePayLater), किश्त (Kissht), लेझीपे (LazyPay), सिम्प्ल(Simpl), स्लाइस (Slice), झेस्टमनी या काही फिनटेक कंपन्या आहेत.
तुम्ही एकाच वेळी अनेक फिनटेक कंपन्यांकडे नोंदणी करू शकता. तुमच्या क्रेडिट प्रोफाइलनुसार तुम्हाला 100 रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंतचं क्रेडिट लिमिट दिलं जातं. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, बिगबास्केट यांसारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवर खरेदीसाठीही बीएनपीएल हा पर्याय उपलब्ध असतो. तसंच, झोमॅटो, स्विगी यांसारखी फूड डिलिव्हरी अॅप्स आणि गो आय बिबो, क्लिअरट्रिप यांसारखी ट्रिप बुकिंग पोर्टल्स आदींमध्येही बीएनपीएल पर्याय उपलब्ध असतो.
डिजिटल कर्ज या विषयातले सल्लागार पारिजात गर्ग यांनी सांगितलं, 'या फिनटेक कंपन्या क्रेडिट कार्ड व्यवहार आणि पेमेंट प्रक्रियेप्रमाणेच व्हर्च्युअल सुविधा तयार करत आहेत. ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाही, अशा लाखो लोकांना समोर ठेवून त्या कंपन्या काम करत आहेत.'
'बीएनपीएल' सुविधा किती किमतीला पडते?
'बीएनपीएल'चं काम क्रेडिट कार्डप्रमाणेच चालतं. उदाहरणार्थ, समजा तुम्ही सिम्प्ल अॅपच्या भागीदार असलेल्या 2500 हून अधिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करत असाल, तर तुमचं बिल दर 15दिवसांनी तयार होतं. बिल भरण्याची तारीख दिलेली असते. त्या तारखेला तुम्ही बिल भरू शकला नाहीत, तर 250रुपयांपर्यंतचा दंड (जीएसटीसह) आकारला जातो.
'किश्त'च्या माध्यमातून खरेदी करताना तुम्ही खरेदीची रक्कम सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीच्या ईएमआयमध्ये रूपांतरित केली, तर वार्षिक 21 टक्के व्याजदर आकारला जातो.
'लेझीपे'द्वारेही बिल पेमेंटसाठी 15 दिवसांची मुदत मिळते. बिल पेमेंट तुम्ही पूर्णपणे करू शकता किंवा 15 ते32 टक्क्यांपर्यंतच्या व्याजदराच्या ईएमआयमध्येही रूपांतरित करू शकता. तुम्ही पेमेंट देईपर्यंत त्याचा प्रति दिवसागणिक हिशेब केला जातो.
ई-पे-लॅटर ही कंपनी बीएनपीएल सुविधा देताना आउटस्टँडिंग बिलाच्या रकमेवर वार्षिक 36 टक्के व्याजदर आकारते.
हप्ता वेळेवर भरता आला नाही,तर... -
'रेक्टिफाय क्रेडिट डॉट कॉम'च्या संस्थापक संचालिका अपर्णा रामचंद्र म्हणतात, 'फिनटेक कंपन्यांकडून आकारलं जाणारं शुल्क कमी वाटलं, तरी ते फुगले, तर आवाक्याबाहेर जाऊ शकतात.'
उदाहरणार्थ, वर पाहिलेल्या उदाहरणात शालिनी राव यांच्याकडून जेव्हा बिल वेळेवर भरलं गेलं नाही, तेव्हा त्यांच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम झाला. कोविड-19 मुळे त्यांची नोकरीही गेली. त्यामुळे त्यांना मासिक हप्ता वेळेवर भरता आला नाही. त्यामुळे त्यांच्यावर 60 हजार रुपयांचं कर्ज झालं. 'बँकांकडून मिळणारं पर्सनल लोन बीएनपीएल योजनेपेक्षा किती तरी स्वस्त असतं,' असं अपर्णा रामचंद्र म्हणतात. अगदी आघाडीच्या बँकाही चांगली क्रेडिट हिस्ट्री असलेल्या ग्राहकांना पाच लाख रुपयांचं पर्सनल लोन पाच वर्षांच्या कालावधीसाठी घेतल्यास 8.9 टक्के ते 10.05 टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याजदर आकारतात.
क्रेडिट स्कोअर (Credit Score) बिघडला, तर भविष्यातही तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता कमी होते. गर्ग यांच्या म्हणण्यानुसार, 'राव यांनी आउटस्टँडिंग अमाउंट भरली, तरी त्यांना अर्थसंस्थांकडून कर्ज मिळवणं मुश्कील होईल. कर्ज मिळालंच, तर त्याचा व्याजदर जास्त असेल.'
अपर्णा रामचंद्र म्हणतात, 'ग्राहकांनी बीएनपीएल योजनेचा लाभ घेण्याआधी हे लक्षात घेतलं पाहिजे, की फिनटेक कंपन्या पर्सनल लोन वेगवेगळ्या रूपात सादर करत आहेत आणि ते महाग आणि असुरक्षित आहेत.'
बीएनपीएलसारख्या कर्जसुविधा घेताना तुम्ही अत्यंत काळजी बाळगली पाहिजे. तो कर्जाचा एक सापळा असतो, जेव्हा बिल 15 ते 30 दिवसांनी तयार होतं किंवा खरेदीची रक्कम ईएमआयमध्ये रूपांतरित केली जाते. अशी सुविधा घेतली, तर बिल तयार होतं त्या वेळी किंवा हप्ता भरायचा असेल त्या वेळी तुमच्या हातात तेवढी रक्कम असेल ,याची खात्री बाळगली पाहिजे.
तुम्ही वेळेवर परतावा केला नाही, तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होईल. शिवाय तुम्हाला दंड भरावा लागेल आणि व्याजही भरावं लागेल. भविष्यात कर्ज मिळण्याच्या शक्यतेवरही त्याचा परिणाम होईल. त्यामुळे अशा प्रकारच्या सोप्या भासणाऱ्या कर्ज योजनांवर अवलंबून राहण्यापेक्षा तुमच्या महिन्याच्या उत्पन्नातच तुमचा खर्च भागेल, याचं नियोजन केलं पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Credit card, Money, Money debt