नवी दिल्ली, 8 जानेवारी : मागील 2021 वर्षात OnePlus Nord 2 स्मार्टफोन ब्लास्ट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या. आता 2022 मध्ये पुन्हा एकदा OnePlus फोनचा ब्लास्ट झाल्याची घटना घडली आहे. यावेळी OnePlus Nord 2 नाही, तर OnePlus Nord CE चा स्फोट झाला आहे. एका युजरने ट्विटरवर याबाबत माहिती देत फोनचे फोटोही शेअर केले आहेत.
ट्विटर युजर दुष्यंत गिरी गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा सहा महिने जुना वनप्लस स्मार्टफोन ब्लास्ट झाला. त्यांनी या फोनचे फोटोही पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये वनप्लस फोनचा मागचा भाग पूर्णपणे डॅमेज झाल्याचं दिसतंय. बॅक पॅनल इतक्या मोठ्या प्रमाणात खराब झालं आहे की फोनची बॅटरी देखील दिसते आहे.
4 जानेवारी रोजी ट्विटर युजरने वनप्लस फोनच्या ब्लास्टबाबत ट्विटरवर माहिती दिली. त्याशिवाय लिंक्डइनवरही या युजरने संपूर्ण घटनेबाबत OnePlus सीईओंना लिहिलं आहे. त्याने सांगितलं, की मला पॉकेटमध्ये काहीतरी हीट जाणवली म्हणून मी फोन पॉकेटमधून बाहेर काढला. फोन पॉकेटमधून बाहेर काढल्याच्या 2 ते 5 सेकंदात फोनचा ब्लास्ट झाला. या ब्लास्टमुळे माझा मृत्यूही होऊ शकत होता. याबाबत कंपनीकडे माहिती दिली असता, त्यांनी ही मोठी बाब नसल्याचं म्हटल्याचं युजरने सीईओंना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.
या संपूर्ण प्रकारानंतर 7 जानेवारी रोजी वनप्लस कंपनीने याबाबत त्यांच्याशी संपर्क केला आणि नवा फोन देण्याबाबत सांगितलं असल्याचं ट्विटर युजरने म्हटलंय.
यापूर्वी अनेकदा OnePlus Nord 2 चा ब्लास्ट झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. परंतु पहिल्यांदाच OnePlus Nord CE चा ब्लास्ट झाल्याचा प्रकार समोर आला. या प्रकाराबाबत कंपनीने कोणतंही स्टेटमेंट दिलं नाही. परंतु त्या युजरला नवा फोन देण्याबाबत सांगितलं आहे. OnePlus सारख्या मोठ्या ब्रँडबाबत सतत अशाप्रकारच्या घटना घडणं चिंतेची बाब आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.